Nashik Cyber Crime : लग्नसराईत सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा (File Photo)
नाशिक

Nashik Cyber Crime : लग्नसराईत सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा

लग्नाचं निमंत्रण? एक क्लिक, मोबाइल हॅक, खाते साफ!

पुढारी वृत्तसेवा

देवळा (नाशिक) : लग्नसराईचा हंगाम सुरू असून, मित्र-नातेवाइकांकडून सोशल मीडियावर लग्नाच्या निमंत्रणांचा वर्षाव होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर लग्नपत्रिका, व्हिडिओ कार्ड्स आणि डिजिटल आमंत्रणांची रेलचेल आहे. या वाढत्या डिजिटल ट्रेंडचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी लग्नपत्रिकेच्या नावाखाली नवा सायबर सापळा तयार केला आहे.

‘कम टू वेडिंग विथ फॅमिली’ असा भावनिक आणि आकर्षक संदेश नागरिकांच्या मोबाइलवर येतो. त्यासोबत जोडलेली एक वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड या नावाने एपीके फाइल दिसायला अगदी साधी वाटते आणि तीच लग्नपत्रिका असल्याचे भासवत लोक ती डाउनलोड करतात. पण त्या क्लिकनंतर काही सेकंदांतच मोबाइलचा पूर्ण ताबा हॅकर्सच्या हाती जातो. मोबाइलमधील सर्व माहिती, फोटो, कॉन्टॅक्ट्स, बँकिंग अ‍ॅप्स आणि ओटीपी हॅकर्सच्या ताब्यात जातात. त्यानंतर बँक खातं रिकामं होण्याचे प्रकार घडत आहेत. काही सायबर सुरक्षातज्ज्ञांच्या माहितीनुसार, या एपीके फाइल्स दिसायला लग्नपत्रिका वाटतात, पण त्या प्रत्यक्षात मालवेअर म्हणजेच हॅकिंग सॉफ्टवेअर असतात. एकदा डाउनलोड झाल्यावर त्या मोबाइलमध्ये आपोआप इन्स्टॉल होतात आणि तुमच्या प्रत्येक टचचा, ओटीपीचा आणि अ‍ॅपच्या वापराचा डेटा बाहेर पाठवतात. राज्यात अशा लग्नपत्रिका हॅकिंग प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

येथे तक्रार नोंदवा

नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा फाइल्स डाउनलोड करू नयेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. अशा फसवणुकीचा प्रकार घडल्यास किंवा संशयास्पद फाइल आली असेल, तर ती डाउनलोड करू नका. फसवणुकीचा प्रकार घडल्यास तत्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा. वेळीच कारवाई केल्यास आपला आर्थिक तोटा टाळता येऊ शकतो.

अलीकडेच माझ्याही मोबाइलवर माझ्या संपर्कातील व्यक्तीकडून ‘कम टू वेडिंग विथ फॅमिली’ असा संदेश आला. लग्नपत्रिका समजून उघडायचा प्रयत्न करताच ती एपीके फाइल असल्याचा संशय आल्याने ती लगेच डिलीट केली.
वैभव पवार, सरपंच, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT