कळवण (नाशिक) : सुरगाणा व कळवण तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. स्ट्रॉबेरी पिकालाही आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार असून शासनाच्या अधिकृत निर्णयात याचा समावेश करण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथा, पश्चिम पट्टा तसेच सापुतारा परिसरातील थंड हवामान व निचऱ्याची चांगली जमीन स्ट्रॉबेरी पिकासाठी अतिशय पोषक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे व चार-पाच महिने फळ देणारे हे नगदी पीक असल्याने अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी याकडे वळत मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू केली आहे. सध्या सुरगाणा तालुक्यात १६० हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.
पर्यटनस्थळांपासूनजवळ असल्यामुळे या पिकाला चांगली बाजारपेठ मिळते. मात्र, अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वारंवार नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडत होते. याअगोदर या पिकाला कोणतीही नुकसानभरपाई मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आमदार निपवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर स्ट्रॉबेरी पिकाला डाळिंब, द्राक्ष, आंबा, काजू व केळीप्रमाणेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळणार असून त्यांना स्थैर्य मिळेल, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी या समस्येवर उपाय म्हणून स्ट्रॉबेरी पिकाला विमा संरक्षण मिळावे अशी मागणी गेल्या निवडणुकीच्यावेळी केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार स्ट्रॉबेरीचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश झाला आहे.नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा
स्टाँबेरी हे फळ नाजुक व लवकर खराब होणारे आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान होते. तरीही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नव्हती. आता ती मिळणार आहे. आमदार पवार यांनी स्ट्रॉबेरीपासून चॉकलेट, ज्युस, पावडर असे अन्य प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावाअशोक गवळी, सरपंच, बोरगाव (सुरगाणा)
कळवण तालुक्यातील सुकापुर, पळसदर, खिराड, लिंगामे, आमदर, देवळीकराड, तताणी, दळवट परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्ट्राॅबेरीची शेतीची लागवड करतात. परंतु अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे स्ट्रॉबेरीचे खूप नुकसान होते. मात्र, नुकसानभरपाई मिळत नव्हती. आता पीकविमात समावेश झाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.छबू कुंवर, शेतकरी, पळसदर (कळवण)