चांदवड : अतिवृष्टी होऊन तब्बल तीन दिवस उलटूनही तालुक्यातील काळखोडे गावातील बाळासाहेब शेळके यांच्या सोयाबीन पिकात साचलेले पावसाचे पाणी (छाया : सुनील थाेरे)
नाशिक

Nashik Crop Damage : अडीच लाख हेक्टरवरील पिके उध्वस्त

दीड लाख हेक्टरवरील मका भुईसपाट : तीन लाख बाधित शेतकरी आर्थिक संकटात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके जामीनदोस्त झालेली असताना, १ ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने जिल्ह्यात तब्बल २ लाख ४७ हजार १९ हेक्टर क्षेत्रातील पिके उध्दवस्त झाली आहेत. यात सुमारे दिड लाख हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले असून सोयाबीन, द्राक्ष, कांदा ,डाळींब, कापूस, भात, सिताफळ, ऊस यांसारख्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील एक हजार ५१९ गावे या पावसामुळे बाधित झाली असून यामधील दोन लाख ६३ हजार २४७ शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून ही बाब समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. यातच दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण ९८ गावांमधील पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उर्वरित गावांमध्ये हे काम जोमाने सुरू आहे. आतापर्यंतच्य मिळालेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात एकूण २ लाख ४७ हजार १९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सर्वाधिक फटका मालेगाव, सटाणा, नांदगाव, येवला व चांदवड तालुक्यांना बसला आहे. देवळा, दिंडोरी, पेठ, इगतपुरी, सिन्नर, सुरगाणा यासारख्या डोंगराळ व आदिवासी पट्ट्यांमध्ये भात, नागली, बाजरी, तूर या पिकांची हानी झाली आहे. द्राक्ष, डाळिंबा सारख्या नगदी पिकांसह प्रमुख पिके उध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत, कर्जमाफी व भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मालेगाव तालुक्याला सर्वधिक फटका

मालेगाव तालुक्यात ११७ गावे बाधित झाली असून सर्वाधिक ५४ हजार २६६ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. यात कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. चांदवड तालुक्यात ११२ गावे बाधित होऊन ४५ हजार २६२ हेक्टरवरील नुकसान झाले. येवल्यात ६४ हजार १७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. नाशिक तालुक्यात ५५ गावे व १ हजार २ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तर त्र्यंबकेश्वरमध्ये ४७ गावे व २६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT