नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पतीने त्वेषात मारलेल्या फावड्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ (पो. श्रीभुवन) येथे शुक्रवारी (दि. २०) पहाटे तीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर संशयित पती गुजरात सीमेवरील जंगलात पसार झाला असून, त्याच्या मागावर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
ऊर्मिला गावित (४४, रा. मोठामाळ) यांनी सुरगाणा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातीलच सीताराम दामू राऊत याचे पत्नी कला (२६) हिच्याशी भांडण झाले. चारित्र्याच्या संशयावरून त्याने हातातील लोखंडी फावड्याने पत्नीच्या मानेवर मारहाण केली. वार वर्मी बसल्याने ती गतप्राण झाली. घटनेनंतर संशयित जंगलात निघून गेला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक संशयिताचा शोध घेत आहेत.