पंचवटी : हिरावाडी येथे पार्किंग वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना घडली. याबाबत मृताच्या नातेवाइकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शवविच्छेदन अहवालामध्ये डोक्यात आणि छातीमध्ये मारहाण झाल्याने तसेच अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्याने पंचवटी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी संशयित वसंत निवृत्ती घोडे (४७), कल्पना वसंत घोडे, (४६), विशाल वसंत घोडे (२४), गणेश वसंत घोडे (२७, सर्व रा. श्री केशव अपार्टमेंट, दामोदर राजनगर, हिरावाडी, पंचवटी) यांना ताब्यात घेतले आहे.
बुद्धन लक्ष्मण विश्वकर्मा (४९) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रितेश बुद्धन विश्वकर्मा (२१) याच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या इमारतीचे चेअरमन वसंत घोडे व इमारतीतील भाडेकरू महेश जगताप यांच्यात पार्किंगच्या जागेतून वाद झाला होता. सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही वाद झाल्याने घोडे यांच्या परिवाराने सोमवारी (दि. २०) रात्री 9 च्या सुमारास जगताप यांच्या घरी जाऊन वाद घातला होता. त्या वादातून संशयित विशाल घोडे हा विश्वकर्मा यांच्या घरात शिरला होता. त्यामुळे रितेशच्या आईने विशालला घराबाहेर जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे विशालने आईवर हल्ला केला होता. त्यामुळे बुद्धन विश्वकर्मा यांनी पत्नीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संशयित गणेश वसंत घोडे व विशाल वसंत घोडे, वसंत घोडे यांनी विश्वकर्मा कुटुंबीयांवर हल्ला केला. त्यात बुद्धन विश्वकर्मा यांना बेदम मारहाण करीत पीव्हीसी पाइप मारून फेकला. या हल्ल्यात रितेशचा भाऊ प्रथमेश, वडील बुद्धन व आई जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, बुद्धन विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विश्वकर्मा कुटुंबीयांनी पंचवटी पोलिसांकडे तक्रार करीत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शवविच्छेदन अहवालानंतर पंचवटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.