Fraud News Pudhari News network
नाशिक

Nashik Crime Updates | 15 कोटी रुपयांत बना कोणत्याही राज्याचा 'गव्हर्नर'!

भामटा गजाआड ; तामिळनाडूतील व्यावसायिकास 6 कोटींचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : लाखो रुपयांत शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष असो किंवा 50 लाख रुपयांत विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवत भामटे नागरिकांना गंडा घालत असल्याचे प्रकार घडले आहेत.

राजकीय ओळखीच्या जोरावर कोणत्याही राज्याचा 'गव्हर्नर' म्हणून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून एकाने तब्बल 15 काेटी रुपयांची मागणी करीत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एकाने तामिळनाडूतील व्यावसायिक व शास्त्रज्ञ असलेल्यास गव्हर्नरपदी नियुक्त करून देतो, असे सांगत त्यांच्याकडून सुमारे ५ कोटी रुपये घेत गंडा घातला. याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

निरंजन सुरेश कुलकर्णी (40, रा. गंधर्वनगरी, नाशिक रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. तामिळनाडूतील चेन्नई जिल्ह्यातील रहिवासी नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (56) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निरंजन याने 12 जानेवारीपासून मुंबई-आग्रा रोडवरील एका हॉटेलमध्ये भेटून गंडा घातला. संशयित निरंजन आणि नरसिम्मा रेड्डी यांची ओळख एका धार्मिक कार्यक्रमात झाली. त्यानंतर झालेल्या भेटीगाठीतून संशयित निरंजनने त्याची राजकीय पक्षातील नेत्यांसोबत ओळखी असल्याचे रे‌ड्डी यांना सांगितले. तसेच मी या राजकीय ओळखींचा वापर करून तुम्हाला कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देऊ शकतो. मात्र, त्या कामापोटी 'सर्व्हिस चार्ज' म्हणून मला 15 कोटी रुपये द्यावे लागतील, असा प्रस्ताव निरंजनने रेड्डी यांना दिला. त्यावर विश्वास ठेवत रेड्डी यांनी निरंजन यास 60 लाख रुपये रोख स्वरूपात व 4 काेटी 48 लाख 99 हजार 876 रुपये निरंजनने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांंवर टाकले. दरम्यान, कागदपत्रांची छाननी करताना ते बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर रेड्डी यांनी निरंजनकडे पैशांची मागणी केली. त्यावर पैसे देण्यास नकार देत निरंजनने रेड्डी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे रेड्डी यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात निरंजनविरोधात फिर्याद दाखल केली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. आंचल मुद्गल यांनी तपास करीत संशयित निरंजन यास नागपूरमधून ताब्यात घेतले. निरंजन यास नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

100 एकर जमिनीची 'गॅरंटी'

7 फेब्रुवारीला निरंजन आणि रेड्डी यांच्यात हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी संशयित निरंजन याने रेड्डी यांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला गव्हर्नरपद मिळाले नाही तर माझ्या नावे असलेली जमीन तुमच्या नावे करेल, असे आश्वासन दिले. त्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्पांजवळील 100 एकर जमीन शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्याची कागदपत्रे दाखवले. त्यावर भारत सरकारची मोहोर होती. तसेच चांदशी शिवारात स्वत:च्या नावे असलेल्या जागेची कागदपत्रे दाखवली. मात्र, ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

राजकीय ओळखींचा दावा

संशयित निरंजन कुलकर्णी याचे बारावीपर्यंत शिक्षण झाल्याचे समजते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण विभागाचा कार्यकर्ता होता. त्यातून बऱ्याच राजकीय ओळखी केल्याचा दावा त्याने केल्याचे बोलले जाते. दरम्यान, तो आता संघटनेत सक्रिय नसल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयिताचे राजकीय पक्षाच्या नेते-पदाधिकाऱ्यांसोबत अनेक फोटो असून, उच्चभ्रू जीवनशैली जगत असल्याचे तो दाखवत असे. त्याच्याकडील कारवर 'खासदार' असा शासकीय लोगो असल्याची चर्चा आहे. तसेच या ओळखींचे संदर्भ देत त्याने अनेकांना गंडवल्याचे बोलले जात आहे.

संशयित निरंजन याने रेड्डी यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर त्याचा वापर मौजमस्तीसाठी केल्याचे समोर येत आहे. तसेच इतर पैसे लपवले असून, पोलिस पैशांचा शोध घेत आहे. वडिलांच्या नावे काही पैशांची मुदतठेवी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

फसवणूक केल्यानंतर संशयित निरंजन हा अमरावती व नागपूर जिल्ह्यांत लपून बसला होता. नागपूर येथे मित्राकडेही त्याने वास्तव्य केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्यास नागपूरमधील एका हॉटेलमधून पकडले आहे. या गुन्ह्यात इतर संशयितांचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे.
संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT