Nashik Crime Update
नानासाहेब कापडणीस, अमीत कापडणीस  file photo
नाशिक

Nashik Murder Case | कापडणीस खून खटल्याची आॅगस्टपासून नियमित सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांचा खून झाल्याची घटना फेब्रुवारी २०२२ मध्ये उघडकीस आली होती. हा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पटलावर आला असून आॉगस्ट महिन्यापासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी (दि. १५) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे नाशिक न्यायालयात हजर होते. (Nashik Murder Case)

नानासाहेब व डॉ. अमित कापडणीस हे पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची तक्रार नातलगांनी नोंदवली होती. सरकारवाडा पोलिसांनी केलेल्या तपासावरून दोघांचा खून झाल्याचे उघड झाले होते. अतिशय थंड डोक्याने कट रचून पिता-पुत्रांचा खून करीत त्यांच्या डिमॅट खात्यातील शेअर्सची परस्पर विक्री करून सुमारे सव्वा कोटी रुपये तसेच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बळकावण्याचा बेत मुख्य संशयित राहुल जगतापसह त्याचा साथीदार संशयित प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांनी रचला होता. त्यासाठी संशयितांनी डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत पिता-पुत्रांचा खून करीत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहांची परजिल्ह्यात विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी तपास करीत चौघांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सुमारे १६०० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी नाशिक पोलिसांनी केलेल्या शिफारसीनुसार गृहविभागाने या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. त्यानुसार अॅड. निकम यांनी सोमवारी (दि. १५) न्यायालयात हजर होते. या खटल्यात सुमारे शंभर साक्षीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या १८ ऑगस्ट २०२४ पासून या खटल्याची नियमित सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयातील खात्रीलायक सूत्रांनी दिली. (Nashik Murder Case)

चौघांपैकी एकास जामीन

पुर्वनियोजित कट रचून संशयित राहुल जगतापने दुहेरी खून केला होता. तसेच त्यांचे शेअर्स विक्री करून मौजमजा केली. मालमत्ता बळकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिस तपासात त्याचा बेत फसला. पोलिसांनी तपास करीत राहुलसह इतर तिघांनाही अटक केली. तेव्हापासून चौघे संशयित न्यायालयीन कोठडीत असून कारागृहात आहेत. चौघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यापैकी सुरज मोरे यास उच्च न्यायालयाने जामीन दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

असे घडलेले हत्याकांड

२८ जानेवारी २०२२ रोजी कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता असल्याची तक्रार सरकारवाडा पोलिसांकडे आली. कापडणीस यांचे मोबाइल व बँक स्टेटमेंटवरून संशयित राहुल याच्यासह प्रदिप शिरसाठ याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांकडे तपास सुरू केला. सखोल तपासात राहुलने दुहेरी खून केल्याची कबुली दिली. नानासाहेबांचा खून करून त्यांचा मृतदेह मोखाडा, तर अमितचा राजूर येथे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले. दुहेरी खुनानंतर कापडणीस यांच्या लहवित येथील वडिलोपार्जित घरात संशयितांनी मालमत्तेच्या १२ किल्ल्या दडविल्या होत्या. त्र्यंबकेश्वर आणि म्हसरूळसह इतर ठिकाणच्या संपत्तीची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. संशयिताने कापडणीस यांचे शेअर्स विक्री करून कोट्यवधी रुपयांतून आलिशान कारची खरेदी केली, तसेच स्वत:चे दुकान थाटण्यासह कापडणीस यांच्या निर्माणाधीन बंगल्याच्या कामासाठी पैसे खर्च केल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते.

SCROLL FOR NEXT