सिडकोतील गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजरचे नाव उघड pudhari photo
नाशिक

Nashik Crime Update | सिडकोतील गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजरचे नाव उघड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिडकोत सुमारे अडीच वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर सुपारी देऊन झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीतून राजकीय कनेक्शन उघड झाले आहे. संशयितांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे युवक पदाधिकारी दीपक बडगुजर यांचा सहभाग समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयित दीपकच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. संशयित अंकुश शेवाळे याच्या मार्फत संशयित मयुर बेद यास जाधव यांना मारण्याची सुपारी दीपकने दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. दीपक हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री सिडकोतील उपेंद्र नगर येथे गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने या हल्ल्यात जाधव जखमी झाले, त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संशयितांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, गुंडा विरोधी पथकाने सखोल तपास करीत संशयित आकाश आनंदा सूर्यतळ (२४, रा. पंचशीलनगर, नाशिकरोड), श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या, सनी पगारे उर्फ टाक्या (दोघे रा. जेतवननगर, उपनगर) यांना अटक केली. मयूर बेदच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर दीपक बडगुजरसोबत जवळीक असलेल्या अंकुश लक्ष्मण शेवाळे (३३, रा. धनलक्ष्मी चौक, सिडको) व प्रसाद संजय शिंदे (२९, रा. नांदूरगाव) या संशयितांना पोलिसांनी अटक केली. पोलिस चौकशीत अंकुशने प्रसादमार्फत संशयित मयूर बेद याला सुमारे दोन लाख रुपये दिल्याचे समोर आले. त्यामुळे गुंडा विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.१३) पुणे येथील चाकण परिसरातून मयूर बेदला पकडले. दरम्यान, मयूर बेद व अंकुश शेवाळे यांच्याकडे शनिवारी (दि.१४) पोलिसांनी केलेल्या चौकशीत दीपक बडगुजरचे नाव समोर आले. अंकुशने दीपकच्या सांगण्यावरून मयूरला जाधववर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचे चौकशीत उघड झाल्याचे समजते. त्यानुसार पोलिसांनी दीपकचा शोध सुरु केला आहे. मात्र अंकुश यास अटक केल्यानंतर दीपक फरार झाल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे दीपकला पकडल्यानंतर अॅड. जाधव यांच्यावर हल्ला का केल्याचे याचे कारण समोर येणार आहे. दरम्यान, अटक केलेल्या अंकुश व प्रसाद यांच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

बडगुजरांभोवती चौकशीचा ससेमिरा

लोकसभा निवडणूकीच्या सुरुवातीस दहशतवादी सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणातही पोलिसांनी बडगुजर यांची सखोल चौकशी केली होती. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सुपारी देत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडगुजर यांच्या मुलाचे नाव समोर आले आहे.

समर्थकांच्या पोस्टवरही नजर

सोशल मीडियावर गोळीबार प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप होत असल्याने पोलिसांनी याकडे विशेष लक्ष ठेवले आहे. अंबड पोलिसांसह सायबर पोलिस ठाण्याकडून सोशल मीडियावरील पोस्टची पडताळणी केली जात आहे.

२०२२ मध्ये गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. तपासात या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांची नावे समोर येत आहे, त्यानुसार त्यांना पकडले जात आहे. सर्व संशयितांना अटक केल्यानंतर गोळीबाराचे कारण स्पष्ट होईल.
- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

संशयिताची मारहाणीची तक्रार

संशयित अंकुश शेवाळे व प्रसाद शिंदे यांना रविवारी (दि.१५) न्यायालयात हजर केले असता अंकुशने पोलिसांकडून मारहाण झाल्याची तक्रार न्यायालयात केली. त्यानुसार अंकुशची वैद्यकीय चाचणीचे आदेश दिले. चाचणीचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालय न्यायालयात सादर करणार आहे. तसेच न्यायालयाने दोघा पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT