नाशिक : खून प्रकरणी अटक केलेले संशयित. समवेत गुन्हे शाखा युनिट एकचे पथक. Pudhari Photo
नाशिक

Nashik Crime Update | ३९ दिवसांनी त्या खुनाची उकल, तिघे गजाआड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सराईत गुन्हेगाराने ऑगस्ट महिन्यात एकाचा खून करून त्याचा मृतदेह रामवाडीलगत कोशिरे मळा परिसरात फेकल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून खून करणाऱ्यासह मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत करणाऱ्या दोघांनाही पकडले आहे.

कोशिरे मळा परिसरात ३१ ऑगस्ट रोजी बेवारस मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अंमलदार विलास चारोस्कर व नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुनील नागू गायकवाड ऊर्फ गटऱ्या (रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कॉलेज रोड जवळ) याने एकाचा खून केल्याची माहिती समजली. त्यानुसार पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून गटऱ्या यास पकडले. सखोल तपासात गटऱ्याला त्याच्या खोलीत राहणाऱ्या पंढरीनाथ ऊर्फ पंड्या गायकवाड याने शिवीगाळ केली होती. त्याचा राग आल्याने गटऱ्याने पंड्या यास दांड्याने बेदम मारहाण करीत खून केला. त्यानंतर संशयित विकास संतोष गायकवाड व साहिल संजय शिंदे यांच्या मदतीने पंड्याचा मृतदेह रिक्षात टाकून कोशिरे मळा येथील मोकळ्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत विकास व साहिल यांनाही अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गटऱ्या सराईत गुन्हेगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गटऱ्याविरोधात गंगापूर, पंचवटी, दिंडोरी, भद्रकाली, उपनगर, अंबड पोलिस ठाण्यांमध्ये २५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केल्या आहेत. सिद्धार्थनगर झोपडपट्टीत त्याने दहशत बसवली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT