नाशिक : घरफोडी करणारे तिघे संशयित व त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल. समवेत गुन्हे शाखा युनिट एकचे पथक. PUDHARI PHOTO
नाशिक

Nashik Crime | चोरट्यांनी परकीय चलन नदीत फेकलं, सोन्याचे दागिने हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राका कॉलनीतील गजबजलेल्या वस्तीत माजी नगरसेविकेच्या घरात घरफोडी करून सुमारे एक किलो सोन्याचे दागिने आणि परकीय चलन चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. या घरफोडीतील मुख्य संशयित पुणे जिल्ह्यातील असून त्याच्याविरोधात घरफोडी, चोरीचे सुमारे ४० गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांकडून पोलिसांनी घरफोडीतील सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, चोरट्यांनी परकीय चलन नदीत फेकल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

गोरखसिंग गागासिंग टाक (३५), दीपक तुकाराम जाधव (३३) व अमनसिंग पंजाबसिंग टाक (३०, तिघे रा. भीमवाडी, गंजमाळ) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. तिघांनी मिळून मंगळवारी (दि. ६) मध्यरात्री राका कॉलनी येथील नवकार रेसिडेन्सी येथील रहिवासी डॉ. ममता शैलेंद्र पाटील यांच्या घरात घरफोडी करून ५७ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १८०० अमेरिकन डॉलर असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. त्यात राका कॉलनीतील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना दुचाकीस्वार तिघे आढळले. त्यानुसार पोलिसांनी राका कॉलनीपासून सुमारे ५ ते ६ किमी अंतरावरील सीसीटीव्ही तपासले. त्यात दुचाकीस्वार चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीवरून गंजमाळपर्यंत चोरट्यांचा माग काढला. त्यानंतर गंजमाळ परिसरात सापळा रचून तिघांनाही घरातून पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी घरफोडीतील ८६६.३४० ग्रॅम वजनी सोन्याचे वेगवेगळे दागिने व लगड हस्तगत केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १५ जीजी ०२५१) व तिघांचे मोबाइल असा एकूण ५७ लाख ६६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरट्यांकडील दुचाकीही त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे उघड झाले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, किरण शिरसाठ, सहायक उपनिरीक्षक सुरेश माळोदे, सुगन साबरे, हवालदार विशाल काठे, प्रशांत मरकड, मिलिंदसिंग परदेशी, अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राम बर्डे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिस आयुक्त कर्णिक यांनी तपास पथकास ७५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बहिणीकडे आला अन् फसला

मुख्य संशयित गोरखसिंग टाक हा शनिवारी शहरात त्याच्या बहिणीकडे मुक्कामी आला होता. त्याच्याविरोधात पुणे येथे घरफोडी, चोरीचे सुमारे ४० गुन्हे दाखल आहेत. तर अमनसिंग टाकविरोधात पंचवटी, सायखेडा व इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. नाशिकला जमल्यानंतर तिघांनी घरफोडी करण्यासाठी दुचाकीही चोरली. तसेच घरफोडीतील सोन्याचे दागिने गंजमाळ येथील घरी आणल्यानंतर त्यांनी ते वितळवण्यास सुरुवात केली. मात्र, वेळीच पोलिस पोहोचल्याने त्यांचा डाव फसला. संशयितांकडून व त्यांच्या नातलगांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी खबरदारी घेत त्यांना पकडले. अनपेक्षितपणे पोलिस आल्याने चोरटेही बुचकळ्यात पडले होते.

डीव्हीआर, परकीय चलन नदीत

संशयित टाक हा सराईत असून, घरफोडी केल्यानंतर तो मागे पुरावे राहणार नाहीत, याची खबरदारी घेत असे. त्यानुसार त्याने डॉ. पाटील यांच्या घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरला होता. हा डीव्हीआर व १८०० अमेरिकन डॉलर नदीपात्रात फेकल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT