नाशिक

Nashik Crime | सुरगाण्यात चक्क तवेरातून खैर लाकडाची तस्करी, संशयित फरार

गणेश सोनवणे

सुरगाणा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- एकेकाळी पेठ, सुरगाणा तालुके हे वनसंपदेने नटलेले तालुके अशी ओळख होती. निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या या भागात सागवान तस्करीची वाळवी लागली आणि डोंगर उघडे बोडके दिसू लागले. बरोबर पर्जन्यमान तर घटलेच पण पावसाच्या या माहेरघरी तापमान वाढ होत उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. ते केवळ अपरिमित वृक्षतोडीमुळे.

वनपरिक्षेत्र अधिकारी सुरगाणा यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार दि. ३० मे रोजी सुभाषनगर कक्ष क्रमांक ५० मध्ये अवैध वृक्ष तोडीचे खैर नग जंगल भागात पालापाचोळा मध्ये लपवून ठेवले असल्याची वन विभागाला खबर मिळाली. त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी सापळा रचून वन परिक्षेत्रातील वनरक्षकांना त्या भागात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यास सांगितले. ३१ मे रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास एक चारचाकी वाहन खैर लपवलेल्या भागातील जंगलात जातांना दिसले. काही वेळाने सदर वाहनाचा मागोवा घेत वनरक्षक गेले असता चारचाकी वाहनात खैरे लाकडे भरत असतानांचा आवाज आला. वन कर्मचारी आल्याचे समजताच लाकडे भरणारे संशयित व चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेले. सदर वाहन तवेरा मॉडेल असून त्याचा नंबर एम. एच. ०४,जीई १४५७ असा आहे. त्यात अवैध वाहतुकीचे आठ खैर नग ०.४६१ घन मीटर माल असून लाकडाची किंमत सहा हजार सातशे सात रुपये आहे. सदर कारवाईत जवळपास एक लाख शहाऐंशी हजार सातशे सात रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश वाघ, तुकाराम चौधरी, भटु बागुल, वनमजूर विठ्ठल चौधरी, विलास पाडवी वनविभागाचा चालक नुर शेख आदींनी कारवाई केली.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT