Nashik Crime | नाकाबंदी तोडून पळणाऱ्या इनोव्हाचा थरारक पाठलाग; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा दणका! 
नाशिक

Nashik Crime | नाकाबंदी तोडून पळणाऱ्या इनोव्हाचा थरारक पाठलाग; गुटखातस्कराला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा दणका!

१५ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह चाळीसगावचा तस्कर जेरबंद; खाकीचा अवैध धंद्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक'

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात अवैध गुटखा माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानंतर पोलीस दल ॲक्शन मोडवर आले आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी १२ रोजी नाकाबंदी दरम्यान फिल्मी स्टाईलने पळून जाणाऱ्या एका आलिशान इनोव्हा कारची नाकेबंदी करत तब्बल १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि वाहन असा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईत चाळीसगावच्या एका तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या असून, पोलीस कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न फसला

पहूरकडून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने संशयित इनोव्हा कार क्रमांक एम एच 18- ए जे -6525 जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाकाबंदी लावली असता, कर्तव्यावर असलेले दीपक पाटील, विकी इंगळे आणि डायल ११२ वरील मनोज महाजन यांनी इनोव्हा थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने पोलिसांना हुलकावणी देत गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करत वाहनाला घेरले आणि गाडीची तपासणी केली असता केसरयुक्त विमल पानमसाला व V-1 सुगंधित तंबाखू ८,३३,६००

इनोव्हा वाहन एम एच 18- ए जे -6525 ७,००,०००/-एकूण मुद्देमाल: १५लाख ३३ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गाडीतील चालक आबा विठ्ठल पाटील (वय ५४, रा. माऊली नगर, चाळीसगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात बी एन एस आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.

ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कल्याणी वर्मा, दीपक पाटील, विकी इंगळे, शाम हटकर आणि मनोज महाजन यांच्या पथकाने बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT