नाशिक : मध्यवर्ती कारागृहात सुटलेल्या एमडी पेडलरची दुचाकीवरून मिरवणूक काढून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या दोघा अल्पवयीन समर्थकांसह पेडलरला पोलिसांनी दणका दिला आहे. सायबर पेट्रोलिंगमध्ये इन्स्टाग्रामवरील हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून माफीचा व्हिडिओ टाकून कोणीही असे कृत्य करू नये, असे आवाहन इतरांना केले.
ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चेतन जाधव यास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहातून चेतनची सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी दुचाकीवरून त्याची मिरवणूक काढली होती. तसेच त्याचे व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही बाब सायबर पेट्रोलिंगमध्ये उघड झाली. त्यामुळे शहर पोलिसांनी रिल पोस्ट करणाऱ्या दोघा अल्पवयीन समर्थकांसह चेतनला ताब्यात घेतले. तिघांकडूनही माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून तो त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर टाकला. यापुढे अशी चूक होणार नाही व इतरांनीही चूक करू नये, असे आवाहन तिघांनी व्हिडिओत केले आहे. याआधीही शहर पोलिसांनी भाईगिरी, दहशत पसरवणारे किंवा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. भविष्यातही सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या गुन्हेगारांसह त्यांच्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर पोलिसांनी दिला