नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पतीस बिअर पाजून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी लातूर येथून दोन महिलांसह एका सर्पमित्रास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये जखमी व्यक्तीची पत्नी, तिची मैत्रीणीचा समावेश आहे. शनिवारी बोरगड येथे संशयितांनी विशाल पाटील (४१) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सर्पदंश करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता.
विशाल यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी एकता विशाल पाटील (३४) हिने आणखी एका साथीदारासोबत मिळून शनिवारी (दि.२७) रात्री प्राणघातक हल्ला केला होता. एकताने विशालला बिअर पाजत मारेकऱ्यास घरात घेतले. त्यानंतर विशालला मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विशालने प्रतिकार केल्याने एकतानेही त्यास मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या संशयिताने बॅगमधून विषारी साप काढून विशालच्या मानेवर सर्पदंश घडवून आणला. त्यामुळे सापाने विशालला चावा घेतला. दोघांच्या तावडीतून सुटून विशाल मित्रांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने म्हसरुळ पोलिस ठाण्यात एकतासह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करीत लातूर येथून एकतासह तिची ३४ वर्षीय मैत्रीण व सर्पमित्र चेतन प्रविण घोरपडे (२१, रा. लातूर) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मालमत्तेच्या वादातून व खर्च करण्यासाठी विशाल पैसे देत नसल्याची कुरापत काढून एकताने हा हल्ला झाल्याचे उघड झाले आहे.
सर्पमित्र घोरपडेवर पोलिसांचा संशय
एकता आणि लातूरमधील महिला या दोघी जिवलग मैत्रीणी असल्याचे समजते. कौटुंबिक वाद झाल्यानंतर एकता काही महिने लातुरला मैत्रीणीच्याच घरी थांबल्याचे समोर आले. विशालने तिची समजूत काढल्यानंतर काही दिवसांपूर्वीच एकता नाशिकला पुन्हा परतली हाेती. सर्पमित्र चेतन घोरपडे हा लातुरचा असून तो एकताच्या मैत्रीणीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकता, तिची मैत्रीण व चेतन यांनी संगनमत करीत हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.