गोळी घालण्याची धमकी दिल्याने बीपी वाढून रहिवाशाचा मृत्यू  संग्रहित छायाचित्र
नाशिक

Nashik Crime News | गोळी घालण्याची धमकी दिल्याने बीपी वाढला, रहिवाशाचा मृत्यू

सरकारवाड्यात गुन्हा दाखल : जलकुंभाचा नळ सुरू करण्यावरून झाला वाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोड परिसरात रहिवासी अपार्टमेंटमध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्याच्या वादावरून एका रहिवाशाने दुसऱ्याला गोळी घालण्याची धमकी दिली. या धमकीने दुसऱ्या व्यक्तीचा उच्च रक्तदाब अचानक वाढला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पद‌्मा मोतीलाल सानप (६०, रा. सुरत, गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे दीर शिवाजी तात्याबा सानप यांच्या अंत्यविधीसाठी त्या पती आणि मुलासह नाशिकला आल्या होत्या. दिराच्या दशक्रिया विधीनंतर त्या गंगापूर रोडवरील सप्तशृंगी कॉलनीत सावली अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटची स्वच्छता करण्यासाठी आल्या होत्या. स्वच्छतेदरम्यान, पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्या जलकुंभाचा नळ सुरू करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या होत्या. मात्र, दुसऱ्या मजल्यावरच्या रहिवासी किरण कांकरिया आणि अर्चना कांकरिया यांनी लोखंडी गेट कुलूपबंद करून ठेवले होते. त्यांनी नळ सुरू करण्याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता, किरण यांनी त्यांना शिवीगाळ करत, तुम्ही इथे क्वचितच येता. टेरेसचा वापर फक्त आम्ही करू शकतो, असे फर्मावले होते.

वाद वाढला आणि किरण यांची पत्नी अर्चना यांनीही पद्मा यांना धक्काबुक्की केली. तेव्हा मदतीसाठी पुढे सरसावलेल्या मोतीलाल सानप यांचा गळा पकडून किरणने त्यांना जिन्यावरून खाली ढकलले. 'फिर यहाॅं मत आओ, वरना एक-एक को गोलीसे उडा दुंगा' अशी धमकी दिली. या वादंगातच मोतीलाल सानप यांचे स्वास्थ्य बिघडले. पद‌्मा यांनी शेजारी वसंत वाघ यांच्या मदतीने त्यांना तातडीने मॅग्नम रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कांकरियांचा रहिवाशांना जाच?

मोतीलाल सानप हे केंद्रीय अबकारी व सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधीक्षक या पदावरून सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. गुजरातमध्ये वास्तव्यास असले, तरी गेल्या २० वर्षांपासून गंगापूर रोड येथे त्यांचे घर आहे. याच अपार्टमेंटमधील तळमजल्यावर वास्तव्यास असलेले शेळके कुटुंबीय किरण व अर्चना कांकरिया यांच्या त्रासाला कंटाळून स्वत:चे घर असतानाही दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहात असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

दु:खातून सावरण्यापूर्वीच दुसरा आघात

मूळचे नांदगाव तालुक्यातील कासारी येथील रहिवासी असलेले सानप कुटुंब नोकरीनिमित्त सुरतला स्थायिक झाले. त्यांचे नाशिकच्या गंगापूर रोडवर स्वतःचे घर असूनही, कांकरिया कुटुंबाच्या त्रासामुळे ते नाशिकमध्ये नियमितपणे राहात नव्हते. मात्र, भावाच्या अंत्यविधीसाठी नाशिकमध्ये आले असताना, मोतीलाल यांचेही निधन झाले. यामुळे सानप कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT