नाशिक कारागृहातून भावाच्या मारेकऱ्याची 'सुपारी' File News
नाशिक

Nashik Crime News | नाशिक कारागृहातून भावाच्या मारेकऱ्याची 'सुपारी'

पालघर पोलिसांनी पकडला संशयित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भावाच्या संशयित मारेकऱ्याच्या खुनाची सुपारी दोघांनी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघर पोलिसांनी एका संशयितास गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह पकडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पालघर पोलिसांनी संशयिताविरोधात शस्त्र बागळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

शुभम सिंग (२९, रा. लु‌धियाना, राज्य पंजाब) असे पालघर पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. तसेच त्याने शहरात सात दिवस रेकी करून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास ठोस माहिती व संधी न मिळाल्याने तो पालघरला गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

१९ मार्च २०२३ रोजी सातपूर येथील कार्बन नाका परिसरात कारमधून पाठलाग करीत तपन जाधव व राहुल मच्छिंद्र पवार (२७, रा. गंगापूर गाव) यांच्यावर एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता. संशयितांनी हवेत गोळीबार केला तर तपनवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. राहुल पवार तेथून पसार झाला होता. संशयितांनी एका कामगारास धमकावत त्याच्या दुचाकीवरून पळ काढला होता. याप्रकरणात संशयितांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली. यातील संशयित आशिष राजेंद्र जाधव, गणेश राजेंद्र जाधव, चेतन अशोक इंगळे, अक्षय उत्तम भारती, भूषण किसन पवार, रोहित मंगलदास अहिरराव (सर्व रा. शिवाजी नगर, सातपूर), सोमनाथ झांजर उर्फ सनी (२२, रा. सातपूर) यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. कारागृहातूनच संशयित आशिष जाधव व परमिंदर उर्फ गौरव राजेंद्र सिंग यांनी दुसऱ्या कैद्यामार्फत शुभम सिंग याच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. परमिंदर हा खून व दरोड्यातील संशयित असून त्याचा कारागृहातच आशिषसोबत संपर्क आला व त्याच्या मार्फत शुभमला सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

शुभम जाळ्यात

नाशिकला सुमारे सात दिवस राहुल पवारच्या घराजवळ रेकी करूनही त्यास संधी मिळाली नाही. तसेच त्यास निश्चित माहिती नसल्याने त्याने नाशिकहून बोईसरला नातलगाकडे जाण्याचा बेत आखला. नातलगांना फोनवरून तसे कळवलेही. मात्र पालघर रेल्वे स्थानकावरच पोलिसांनी त्यास संशयावरून पकडले. शुभम हा मूळचा उत्तर प्रदेशमधील असून लुधियानामध्ये त्याने गुन्हे केल्याचे समजते. शुभमसोबत असलेल्या रिक्षाचालकासह एकाची पोलिस चौकशी करीत आहेत.

दहा वर्षांपूर्वी खून

संशयित राहुल पवार याच्याविरोधात एप्रिल २०१४ मध्ये अमोल राजेंद्र पवार याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. भावाच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी संशयित आशिष राजेंद्र जाधव याच्यासह इतरांनी राहुल पवारवर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र राहुल त्यातून वाचला तर हल्ला केल्याप्रकरणी संशयित कारागृहात गेले. तेथून त्यांनी पुन्हा राहुलच्या खुनाचा कट रचल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT