क्राईम न्यूज File Photo
नाशिक

Nashik Crime News | गंभीर गुन्ह्यांची उकल होईना; नवीन अधिकाऱ्यांसमोर आव्हान

गुन्ह्यांचा तपास थंडावला; पोलिसांना आलेले अपयश गुन्हेगारांच्या पथ्यावर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र आहे. म्हसरूळ येथील वृद्धेचा खून, मुंबई नाका येथील व्यावसायिक वाहनातून गांजा वाहतूक करणारी जोडी, गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी एमडी विक्री करणाऱ्यांना पकडल्यानंतर त्या गुन्ह्यांचाही तपास थंडावला आहे. त्यामुळे गुन्हे दाखल असूनही सखोल तपास हाेत नसल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यांमधील प्रभारी अधिकाऱ्यांची बदली केल्यानंतर या गुन्ह्यांचा उलगडा होईल, असा विश्वास वर्तवला जात आहे.

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुलमाेहरनगर परिसरात ८० वर्षीय कुसुम सुरेश एकबाेटे यांचा १० जुलै राेजी सकाळी खून झाल्याचे उघड झाले. मारेकरी कुसुम यांच्याच इमारतीतील रहिवासी असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो अद्याप सापडलेला नाही. तसेच २१ व २२ जून राेजी गुन्हे शाखेच्या पथकांनी रविवार कारंजा व पखाल राेड येथे दाेन कारवाया करीत एकूण साडेचार लाख रुपयांचे ९० ग्रॅम एमडी जप्त केले. याप्रकरणी तिघांना पकडून सरकारवाडा व मुंबई नाका पाेलिसांत एमडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. मात्र, या गुन्ह्यांचा तपास थंडावला असून, त्यातील म्होरके पोलिसांच्या हाती न लागल्याने एमडी विक्रेते अद्यापही मोकाट असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाका पाेलिसांनी ८ जुलै राेजी दीपालीनगर भागात गस्तीदरम्यान संशयास्पदरीत्या थांबलेल्या कारची तपासणी केली. तेव्हा कारमध्ये ४ लाख रुपयांचा १९ किलाे गांजा आढळला हाेता. त्यामुळे कारचालक किरण धुमाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मात्र, हा गांजा ज्या महिला व पुरुषाने पुणे येथून नाशिकला आणला ते अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यात मुंबईनाका पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे या गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना आलेले अपयश गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे.

पोलिस-गुन्हेगारांमधील संबंध उघड

नवीन अधिकाऱ्यांसमाेर जुन्या गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच नवीन गुन्ह्यांना आवर घालण्याचे आवाहन राहणार आहे. तसेच मुंबईनाका येथील दंगलीत पोलिस अंमलदाराचा सहभाग उघड झाल्याने पोलिस आणि गुन्हेगारांमधील संबंध पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे वरिष्ठांना गुन्हेगारांशी संबंध असणाऱ्या पोलिसांवरही अंकुश आणून गुन्हेगारी मोडून काढावी लागणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT