पिंपळनेर: महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश पिंपळनेर पोलिस प्रशासनाने काल कृतीतून दिला. मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा टवाळखोरांची काल बसस्थानक ते महाविद्यालय परिसरात धिंड काढण्यात आली.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे मुलींची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही पुन्हा दुसऱ्यांदा छेडखानीचा प्रकार घडला. इतकेच नव्हे तर मुलीला पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. शिवाय एका टवाळखोराला नागरिकांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले होते, तो देखील पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाला होता. यामुळे समाजात संतापाची लाट उसळली होती.
जनभावना उसळल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. त्यानंतर शुक्रवारी (दि.19) सकाळी पोलीस बंदोबस्तात विशाल भामरे आणि सुधीर पवार या दोघा टवाळखोरांची धिंड काढून महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत,हा स्पष्ट इशारा देण्यात आला.
बस स्टॅन्ड, मुख्य चौक, कॉलेज परिसर अशा वर्दळीच्या भागातून ही धिंड काढण्यात आली. यावेळी महिलांचा सन्मानकरा असा संदेश देण्यात आला. अनेक नागरिक, विद्यार्थी व महिला वर्गाने या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले. याप्रसंगी एपीआय किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे, भूषण शेवाळे, संदीप संसारे, पोकॉ रविंद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, योगेश महाले, प्रविण धनगर, दिनेश माळी आदी उपस्थित होते. दरम्यान,या कारवाईमुळे एकीकडे आरोपींना कठोर धडा मिळाला असताना, दुसरीकडे समाजातील विकृत प्रवृत्तींसाठी हा कडक इशारा ठरला आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन मुलींमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून, तक्रार करण्याचे धैर्य निर्माण झाले आहे.