नाशिक (चांदवड) : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीची रक्कम वळविण्यासाठी ‘म्युल अकाउंट’ वापरण्याचे प्रकार वाढत असतानाच, चांदवड येथे अशाच एका प्रकरणात 26 लाख 35 हजारांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अज्ञात खातेदार व संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई मनोज अलगट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांदवड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तपासादरम्यान अॅक्सिस बँकेच्या चांदवड शाखेतील एका खात्याचा ‘म्युल अकाउंट’ म्हणून वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यामार्फत विविध 'ॲक्नॉलेजमेंट' (पोचपावती) क्रमांकांच्या आधारे फसवणुकीची रक्कम वळविण्यात आल्याचा आरोप असून, एकूण 26 लाख 35 हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी संबंधित खात्याचा खातेदार व खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या व्यवहारामागील मुख्य सायबर टोळीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
‘म्युल अकाउंट’ म्हणजे काय?
सायबर गुन्ह्यांत फसवणुकीतून मिळालेली रक्कम लपविण्यासाठी किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळविण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते म्हणजे ‘म्युल अकाउंट’ होय. अनेकदा किरकोळ कमिशन किंवा इतर आमिष दाखवून व्यक्तींकडून त्यांची बँक खाती वापरून घेतली जातात. अशा खात्यांचा वापर करणारे किंवा आपले खाते वापरण्यास देणारे व्यक्तीदेखील कायदेशीर कारवाईस पात्र ठरू शकतात.