दंगेखोरांवर 'मोक्का'च्या हालचाली
गुन्हेगारांवर अंकुश बसण्याची शक्यता file photo
नाशिक

Nashik Crime News | दंगेखोरांवर 'मोक्का' कारवाईच्या हालचाली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : बजरंगवाडी परिसरात रविवारी (दि.१४) रात्री दोन गटांत झालेल्या वादातून दंगल उसळली होती. यात दोन्ही गटांतील संशयितांनी धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्यांचा वापर करीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला, वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या संशयितांविरोधात मोक्का कारवाई करण्याचा विचार शहर पोलिस करीत आहेत. त्यामुळे या टोळ्यांमधील गुन्हेगारांवर अंकुश बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बजरंगवाडी परिसरात एका गटातील गुन्हेगारांनी सोमनाथ भगत, मयूर भगत यांच्यावर बजरंगवाडी परिसरात हल्ला केला. संशयितांनी तेथून जाणाऱ्या एमएच १५ जीआर ६५१७ क्रमांकाच्या कारचे नुकसान करीत सोमनाथ भगत, मयूर भगत, पवन भगत यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. बजरंगवाडी परिसरातील अभिषेक जाधव, राहुल ब्राह्मणे, नवाज खान व त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांसह खडकाळी येथील जुबिन मोहमंद सैय्यद, मतीन रुबाब शेख, जफर शेख, इसुफ शेख, रजा व इतर ६ ते ७ संशयित यांच्यात वाद झाला होता. दोन्ही गटांतील संशयितांनी एकमेकांवर हल्ला केला. त्यात भगत यांच्या कारचीही तोडफोड केली. तसेच कारमधील तिघांवरही प्राणघातक हल्ला केला.

धारदार शस्त्रे, लाठीकाठी, दगड-विटांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ले केले. तसेच परिसरातील वाहनांचेही नुकसान झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपासात या गुन्ह्यात दोन तडीपार गुंडाचाही समावेश आढळून आला. तसेच इतर संशयितांंविरोधातही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे या संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध ठेवण्यासोबत गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार मोक्का कारवाई प्रस्तावित करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अभिषेक गोपाळ जाधव, राहुल अशोक ब्राह्मणे, नवाज हसन खान, जुबीन मोहमंद सय्यद, मतीन रुबाब शेख, जफर शेख, इसुफ शेख यांच्यासह सुमारे २० जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, त्यातील राहुल ब्राह्मणे व नवाज खान हे दोघे तडीपार असतानाही शहरात आढळून आले. तसेच गुन्ह्यात सहभागी झाले. त्यामुळे या टोळींमधील गुन्हेगारांवर मोक्का कारवाई प्रस्तावित केली जाण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT