नाशिक : राज्यभरात एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जचे रॅकेट खोलवर असले तरी, नाशिक त्यांचे केंद्रस्थान असल्याचे आता हळुहळु समोर येत आहे. शहरातील कारखाने पोलिसांनी उद्ध्वस्त केले असले तरी, एमडी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पूर्णपणे बिमोड करण्यात अजूनही पोलिसांना म्हणावे तितके यश आलेले नाही. गेल्या शुक्रवारी (दि. १३) एमडी विक्री करणाऱ्या सराईताला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर शनिवारी (दि. १४) आणखी दोघांना ८.५ ग्रॅम एमडीसह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गुन्हेशाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत, दोन संशयित आॅटो रिक्षातून (एमएच १५ एफयू ९२९२) छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानुर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘एमडी’च्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडून कायदेशीर कार्यवाहीचे आदेश प्राप्त केले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने संशयित सुमीत अशोक धाईंजे (२७, रा. लोखंडे मळा, हनुमंतनगर, उपनगर, नाशिक रोड) याच्याकडे २२ हजार पाचशे रुपये किंमतीचा ४.५ ग्रॅम वजनाचा एमडी, तर शाकीर हसन सय्यद (३२, रा. विनस सोसायटी, वडाळागाव चौफुली, वडाळागाव) याच्याकडे २० हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम एमडी असा एकुण ४२ हजार ५०० रुपये किंमतीचा ८.५ ग्रॅम वजनाचे एमडी आढळून आले. रिक्षासह एकुण दोन लाख १२ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांनी फिर्याद नोंदवून दोन्ही संशयितांना आडगाव पोलिसांकडे मुद्देमालासह सुपूर्द केले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सातत्याने एमडी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, पोलिसांसमोर त्यांच्या रॅकेटचे पाळेमुळे खोदून काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. इतर जिल्ह्यातूनदेखील नाशिकमध्ये एमडी विक्री करणारे यापूर्वी आढळून आल्याने, या रॅकेटचे धागेदोरे राज्यभर पसरले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एमडी विक्रेते पोलिसांच्या हाती लागत असले तरी, एमडी घेणारे ग्राहक कोण? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार, एमडीचे तरुण ग्राहक असून, विक्रेते त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफार्मच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचे काम करीत आहेत. यासाठी कोडवर्ड ठरविले असून, त्याचा वापर करूनच एमडी विक्रेते तरुणांपर्यंत पोहोचत आहेत