Fraud Case Pudhari
नाशिक

Nashik Fraud Case | नोकरीचे आमिष दाखवून ९८ लाखांची फसवणूक

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विविध शासकीय विभागांत शिफारशीद्वारे कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन जणांनी ९८ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश भारती, शंभूराजे देशमुख उर्फ सचिन हंबीरराव पाटील व राजेश भारती याची पत्नी स्वाती भारती यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मेलद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला होता. त्यानंतर फिर्यादीचा भाचा तसेच त्यांच्या ओळखीचे नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार यांना गाठले होते.

या बेरोजगार युवकांना विविध मेलद्वारे विविध शासकीय विभागांचे नियुक्तीपत्र (शासकीय विभागाचे नाव, लोगो, त्या त्या विभागांतील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व शिक्के) असे पाठवून त्यांना शासकीय विभागात कोट्यातून व शिफारशीद्वारे कायमस्वरूपी नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने ९७ लाख ७९ हजार रुपये इतकी रक्कम आरोपींच्या नावे असलेल्या क्यूआर कोड व इतर बँक खात्यांवर घेतली. त्यानंतर उमेदवारांना बनावट शासकीय मेलद्वारे बनावट शासकीय दस्तऐवज करून त्यावर शासकीय विभागाचे नाव, लोगो, त्या त्या विभागांतील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व शिक्के वापरून फिर्यादीसह बेरोजगार उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार जून २०२५ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे अधिक तपास करीत आहेत.

मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डाची बदल; ३० हजारांना गंडा

सिडको : सिडको परिसरात एटीएम कार्डची अदलाबदल करत ज्येष्ठ नागरिकाची ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एटीएम केंद्रांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अंबडमधील महाजननगरी येथील रहिवासी प्रमोद रंगनाथ सातपुते (६१) हे सेवानिवृत्त आहेत. ९ एप्रिलला सायंकाळी ते पवननगरमधील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे एका अज्ञाताने मदतीचा बहाणा करत सातपुते यांच्याशी संवाद साधला. या भामट्याने शिताफीने त्यांच्या एटीएम ऐवजी बनावट कार्ड त्यांच्या हाती दिले. मात्र, काही वेळात त्यांच्या मोबाइलवर पैसे काढले गेल्याचा मेसेज आला. चोरट्याने मूळ कार्डाचा वापर करत १० हजार रुपयांचे ३ व्यवहार करत ३० हजार रुपये परस्पर काढून घेत सातपुते यांची फसवणूक केली. सातपुते यांनी त्वरित अंबड पोलिस ठाणे गाठत अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हवालदार बनतोडे तपास करत आहेत. पोलिस सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT