नाशिक

Nashik crime news: धरणगावच्या ‘त्या’ इराणी सुंदरीचे थेट ‘पाकिस्तान कनेक्शन’; ‘सलमान भाई’ला लावले व्हिडीओ कॉल

​सिम कार्ड पुरवणाऱ्या तिसऱ्या आरोपीला बेड्या; देशद्रोही कारवायांच्या संशयावरून न्यायालयाने जामीन फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : धरणगाव येथे बेकायदेशीररीत्या मुक्काम ठोकणाऱ्या इराणी महिलेच्या प्रकरणाने आता एक धक्कादायक आणि गंभीर वळण घेतले आहे. हे प्रकरण केवळ बेकायदेशीर वास्तव्यापुरते मर्यादित नसून याचे धागेदोरे थेट शत्रूराष्ट्र पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयितांनी पाकिस्तानमधील ‘सलमान भाई’ आणि ‘सलमान खान’ नावाच्या व्यक्तींशी व्हॉट्सॲप आणि व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधल्याचे समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जामीन फेटाळून लावला आहे.

​‘सलमान भाई’ कोण? व्हिडीओ कॉलमुळे खळबळ

धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांच्या मोबाईल आणि कॉल रेकॉर्डची कसून तपासणी केली असता, पोलिसांना धक्कादायक पुरावे हाती लागले. या आरोपींनी पाकिस्तानमधील व्यक्तींशी आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे ‘सलमान भाई’ आणि ‘सलमान खान’ अशा नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल्स करण्यात आले आहेत. धरणगावात बसून पाकिस्तानात व्हिडीओ कॉल कशासाठी? आणि हा ‘सलमान’ नेमका कोण? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या संवादामुळे हे प्रकरण साधे नसून त्यामागे काही देशविघातक हेतू आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.

​तिसरा आरोपी गळाला; तेलंगणा कनेक्शन उघड

पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही ८ जानेवारी रोजी अटक केली. हा संशयित मूळचा तेलंगणाचा रहिवाशी असून सध्या धरणगावात वास्तव्यास होता. या इराणी महिलेला स्थानिक पातळीवर वापरण्यासाठी सिम कार्ड याच व्यक्तीने पुरविल्याचा आरोप आहे. परदेशी नागरिक, त्यातही संशयास्पद हालचाली असताना तिला सिम कार्ड देणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात; जामीन नाकारला

विदेशी महिलेला आश्रय देणे आणि पाकिस्तानशी संपर्क असणे, ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे मत सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडले. ॲड. गजानन पाटील आणि संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात निष्पन्न झालेल्या या धक्कादायक बाबींमुळे धरणगाव न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी बाहेर आल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते आणि तपासात अडथळा येऊ शकतो, यामुळे न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

​पोलीस अधीक्षकांचा दुजोरा

दरम्यान, या प्रकरणातील पाकिस्तान कनेक्शन आणि संवादाच्या वृत्ताला जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे. संशयितांचा पाकिस्तानातील व्यक्तीशी एक-दोन वेळा संवाद झाला असल्याचे त्यांनी मान्य केले असून, पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत. शांत समजल्या जाणाऱ्या धरणगावात थेट पाकिस्तान कनेक्शन निघाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT