नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा व रामकाल पथाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण केल्याप्रकरणी पंचवटीतील तिघा नगरसेवकांसह तीन झेरॉक्स नगरसेवकांची टक्केवारी प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आता आणखी दोन विद्यमान बाहुबली नगरसेवकांसह एकूण पाच जण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. ठेकेदारांकडून माहिती मागवून अधिकाऱ्यांना त्रास देणे आणि कामांमध्ये अडथळा आणल्याच्या तक्रारींमुळे या सर्वांविरुद्ध कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये सत्तारूढ नगरसेवकांकडून अडथळे आणले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पंचवटीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान काही झेरॉक्स नगरसेवकांनी कामगारांना मारहाण करून काम बंद पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित ठेकेदाराने थेट पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुरुवारी (दि. ९) पंचवटीतील तीन झेरॉक्स नगरसेवकांसह तीन बाहुबली नगरसेवकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सातपूर आणि सिडको परिसरातील प्रत्येकी एक अशा दोन बाहुबली नगरसेवकांविरुद्धही तक्रारी वाढल्या आहेत. यापैकी एकावर यापूर्वीच कारवाई झाल्याचे सांगितले जाते, तर दुसरा अद्याप कारवाईपासून दूर असल्याची चर्चा आहे. सिडको व नाशिक पश्चिम भागातील काही झेरॉक्स नगरसेवकांकडूनही ठेकेदार व अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधितांकडे कारवाईचा मोर्चा वळविल्याची चर्चा आहे.
सिंहस्थ कुंभमेळासंदर्भातील कामांमध्ये कोणी अडथळा आणत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.- गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री
कुंभमेळामंत्र्यांकडून दखल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सिंहस्थच्या कामांमध्ये अडथळा आणणे आणि अधिकाऱ्यांना त्रास देणे ही गंभीर बाब असून यामुळे पक्षाची बदनामी होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांनी पाइपलाइन फुटल्याच्या कारणावरून ठेकेदारांकडे भेट दिली होती आणि त्यांनी कोणतीही वसुली केली नसल्याचा दावा केला असला, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. पक्षाकडूनही स्वतंत्रपणे माहिती मागविण्यात आली असून, दोषींवर कारवाई होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सिंहस्थशी संबंधित कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.