जळगाव: अमळनेर तालुक्यात मक्याच्या पिकाआड चक्क गांजाची शेती फुलवणाऱ्या एका बहाद्दर शेतकऱ्याचा अमळनेर पोलिसांनी अक्षरशः 'गेम' केला आहे. गडखाम्ब शिवारातील गट नंबर २३२४ मध्ये पोलिसांनी शनिवारी (७ फेब्रु.) भल्या पहाटे ६ वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल एक बिघा क्षेत्रातील गांजाचा डोलारा उध्वस्त केला असून, ओला आणि सुका अशा मोठ्या प्रमाणावरील मुद्देमालासह शेतकरी सुरेश लोटन पाटील याला बेड्या ठोकल्या आहेत.
मक्याच्या पिकात 'नशिल्या' झाडांची लागवड
गडखाम्ब येथील सुरेश पाटील याने आपल्या शेतात मका लावला होता. मात्र, या मक्याच्या आड त्याने अत्यंत खुबीने गांजाची लागवड केली होती. ही झाडे सुमारे ६ फूट उंचीची झाली असून पूर्णतः बहरलेली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना या 'काळ्या' धंद्याची कुणकुण लागली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या टीमसह 'ऑपरेशन गांजा' आखले.
भल्या पहाटे पोलिसांचा 'स्ट्राईक फोर्स' धडकला
पोलीस निरीक्षक निकम यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची रीतसर परवानगी घेतली आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना सोबत घेऊन पहाटे ६ वाजताच संशयित शेताला वेढा घातला. पोलिसांचा हा ताफा पाहून शेतकऱ्याची पाचावर धारण बसली. शेतात पाहणी केली असता, मक्याच्या आडोशाला गांजाची झुडपे डोलताना दिसली. एवढेच नाही तर, ५ ते ७ गोण्यांमध्ये भरलेला ओला गांजा आणि काही ठिकाणी वाळत घातलेला सुका गांजाही पोलिसांच्या हाती लागला आहे.
काही माल आधीच विकल्याची कबुली
पोलिसांच्या तडाख्यात सापडलेल्या सुरेश पाटील याने धक्कादायक कबुली दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गांजाचा काही साठा विकल्याचे मान्य केले आहे. यामुळे यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, आता ही सर्व 'नशिली' झाडे उपटून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
यांनी केली ही धडाकेबाज कारवाई
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, श्यामल पारधी, निलेश पाटील आणि विनोद पाटील यांच्या टीमने हा छापा यशस्वी केला.