नाशिक : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व नाशिक रोड कारागृहात स्थानबद्ध असलेल्या सराईत गुन्हेगाराची मंगळवारी (दि. २३) कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी बेथेल नगर ते आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपूर रोडवर कार व दुचाकी वाहनांच्या गर्दीत पायी वरात काढली. या जमावात सराईत गुन्हेगारांसह हद्दपारी झालेल्या गुंडांचाही सहभाग आढळून आला. त्यामुळे सरकारवाडा पोलिस ठाण्यात कारागृहातून सुटका झालेल्या गुन्हेगारासह इतर सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारागृहातून बाहेर पडलेल्या सराईत गुन्हेगाराची साथीदारांनी शरणपूर रस्ता भागात अलिशान मोटारीतून मिरवणूक काढली. यावेळी अर्वाच्च घोषणाबाजी, वाहनांचे कर्कश भोंगे वाजवत दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. यातील हर्षद पाटणकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शहर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. वर्षभर तो कारागृहात होता. कारागृहातून तो बाहेर आल्यानंतर साथीदारांनी मंगळवारी (दि.२३) रोजी दुपारी अलिशान मोटारीतून त्याची मिरवणूक काढली.
हर्षद सुनील पाटणकर याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर हर्षदची मंगळवारी (दि.२३) रोजी कारागृहातून सुटका झाली. त्यामुळे बेथेल नगर येथील त्याच्या मित्रपरिवारासह समर्थकांनी त्याच्या स्वागत मिरवणुकीचे नियोजन केले. त्यानुसार मंगळवारी दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास बेथेल नगर, आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपूर रोड या मार्गावर कार (एमएच १५ जीएक्स ८७२१) मधून हर्षदची मिरवणूक काढली. त्यात त्याच्या मित्रपरिवाराने व समर्थकांनी आरडाओरड करीत अर्वाच्च घोषणाबाजी केली.
वाहनांचा विनाकारण हॉर्न वाजवत दहशत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकर याच्यासह मिरवणुकीत सहभागी हद्दपार असलेले गुंड गोपाल नागोरकर, वेदांत चाळदे यांच्यासह शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबीनसन बत्तीसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी (सर्व रा. शरणपूर रोड, बेथेल नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करीत विनापरवानगी जमाव गोळा करून मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याआधीही कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांसह त्यांच्या समर्थकांनी शहरात मिरवणुका काढत गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वायरल करत दहशत करण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी संबधितांवर कारवाई केली होती, तरीदेखील असे प्रकार सुरूच आहेत. त्याचप्रमाणे असे रील्स टाकून प्रतिस्पर्धी टोळ्यांनाही अप्रत्यक्षरित्या आव्हान देण्याचे प्रकार होत असल्याचे बोलले जाते.
शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील सुमारे ८० गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. मात्र त्यापैकी बहुतांश गुंड शहरातच वावरत असल्याचे वास्तव आहे. त्यातील काही गुंडांनी हद्दपारी काळात शहरातच गुन्हे केल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे हद्दपारी कारवाईचे आकडे कागदावरच ठसठशीत दिसत असून प्रत्यक्षात धाक व गांभीर्य नसल्याची चर्चा आहे.