crime News
क्राईम न्यूज Pudhari File Photo
नाशिक

Nashik Crime News | भामट्यांकडून तिघांना ७१ लाखांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील तिघांना ७० लाख ९४ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पाेलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तिघांनी सायबर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना दि. १५ मार्च ते १२ जून या कालावधीत गंडा घालण्यात आला. शेअर मार्केटमध्ये आमच्यामार्फत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देऊ, असे आमिष दाखवून भामट्यांनी तिघांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. त्यासाठी सोशल मीडियावरून संशयितांनी संपर्क साधला. तिघे गुंतवणुकीस तयार झाल्यानंतर भामट्यांनी त्यांना वेगवेगळी बँक खाती क्रमांक व फोन पे नंबर दिले होते. त्यानुसार एकाने ५१ लाख ४६ हजार ५०० रुपये, तर दोघांनी मिळून १९ लाख ४७ हजार ५०० रुपये भामट्यांना दिले. पैसे मिळाल्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे तिघांच्या लक्षात आले. याप्रकरणी तिघांशी संपर्क साधणाऱ्यांसह ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस तपास करीत आहेत.

कोट्यवधी रुपयांचा गंडा

भामट्यांनी शेअर मार्केटच्या बहाण्याने शहरातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आतापर्यंत दाखल गुन्ह्यांनुसार भामट्यांनी नाशिककरांना सुमारे २५ कोटी रुपयांपर्यंत फसवले आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून, अनेकांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे केल्या आहेत. तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांमध्येही फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत.

SCROLL FOR NEXT