शेअर मार्केट file photo
नाशिक

Nashik Crime News|शेअर मार्केटचे आमीष देत ३.५९ कोटींचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून भामट्यांनी शहरातील दोघा व ओझर येथील एकास तब्बल ३ काेटी ५९ लाख ५ हजार ९०० रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर व ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले असून पोलिस तपास करीत आहेत.

  • शेअर मार्केटमधील आयपीओ मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक

  • भामट्याने व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केला होता.

  • सायबर क्राइम पोलिस पोर्टलच्या १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार

ओझर येथील दहावा मैल परिसरातील दुध व्यावसायिकाने ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची ३० एप्रिल ते ७ जून या कालावधीत फसवणूक झाली. भामट्यांनी दुध व्यावसायिकासोबत संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमधील आयपीओ मिळवून देतो असे सांगत पैसे मागितले. त्यासाठी भामट्याने जीओजीत फायन्सिअल सर्व्हिसेस लिमीटेड नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमधील मोबाइलधारकांनी दुध व्यावसायिकासोबत वारंवार संपर्क साधून २ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. त्यानुसार व्यावसायिकाने भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे टाकले. मात्र ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही किंवा गुंतवलेले पैसेही परत मिळाले नाहीत त्यामुळे दुध व्यावसायिकाने भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे व्यावसायिकाने सायबर क्राइम पोलिस पोर्टलच्या १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली.

या तक्रारीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत शहरातील दोन व्यावसायिकांना भामट्यांनी १८ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीत १ कोटी ३४ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा गंडा घातला. शहरातील व्यावसायिकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना भामट्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमधून संपर्क साधला. त्यांनी दोघा व्यावसायिकांना लिंक पाठवून त्यावरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू असे सांगितले. त्यानुसार दोघा व्यावसायिकांनी वेळोवेळी पैसे गुंतवले. मात्र परतावा किंवा गुंतवलेले पैसे परत मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी शहर सायबर पोलिसांकडे संपर्क साधून तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

शहरात आजपर्यंत १६ कोटींची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमीष दाखवून भामट्यांनी शहरातील नागरिकांना सुमारे १६ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या गुन्ह्यांमध्ये अद्याप एकाही संशयितास अटक न केल्याने फसवणूकीचे प्रकार सुरुच आहे. तसेच फसवणूकीची रक्कम परत मिळवण्यातही अडचणी येत असल्याचे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT