नाशिक : माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामिनावर असलेल्या दीपक सुधाकर बडगुजर याच्यासह अटक केलेल्या सहा संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांवरील मकोका कारवाईच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी यासंदर्भात मकोका न्यायालयात अर्ज दाखल केला असून, यापुढील कारवाई मकोका कायद्यानुसार होणार आहे.
मयूर चमन बेद (३७, रा. फर्नांडिसवाडी, नाशिक रोड), बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे (३२, रा. जेतवननगर, नाशिक रोड), टाक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे (३१, रा. जेतवननगर, नाशिक रोड), आकाश आनंद सूर्यतळ (२४, रा. नांदूर गाव), परिणय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे (२९, रा. लक्ष्मी चौक, सिडको), दीपक बडगुजर (रा. सावतानगर, सिडको), प्रसाद संजय शिंदे (२९, रा. नांदूर गाव) या संशयितांवर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. सात संशयितांपैकी सहा संशयित अटकेत असून, बडगुजर यास अटकपूर्व जामीन मंजूर आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर गाेळीबार झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एक-एक साखळी जोडत सात संशयितांची नावे उघड करीत त्यांची धरपकड केली. त्यात दीपक बडगुजर याने गोळीबारासाठी संशयितांना सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यामुळे गुन्हेगारांनी संघटितपणे गुन्हा केल्याचे उघड झाले.
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी या गुन्ह्याचा तपास करीत टोळीविरोधात मकोका प्रस्ताव तयार करीत मंजुरीसाठी सादर केला होता. पोलिस आयुक्त कर्णिक यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने या टोळीविरोधात मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान, मयूर बेद टोळीविरोधात यापूर्वीही मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बडगुजर यास न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खटल्याची सुनावणी मकोका न्यायालयात होणार आहे. त्यासाठी पोलिस पुन्हा संशयितांचा ताबा घेतील. तसेच दीपक बडगुजर याचा जामीन रद्द करावा, यासाठी पोलिस मकोका न्यायालयात अर्ज करणार आहेत. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र १८० दिवसांत न्यायालयात सादर करावे लागणार आहे. त्यामुळे संशयितांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.