Nashik Cirme | ‘एमडी' ड्रग तस्कराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या! 
नाशिक

Nashik Cirme | ‘एमडी' ड्रग तस्कराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या!

पाळधी-तरसोद बायपासवर कचरा फॅक्टरीजवळ ट्रॅप; सराईत गुन्हेगार अजय गारुंगेकडून २ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: तरुणाईच्या नसांमध्ये 'एमडी'चे विष पेरणाऱ्या सराईत तस्कराचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उधळून लावला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी-तरसोद बायपासलगतच्या कचरा फॅक्टरी परिसरात गुरुवारी (दि. १) दुपारी २.२० वाजता एलसीबीच्या पथकाने थरारक सापळा रचून तांबापुरा येथील कुख्यात आरोपी अजय बिरजू गारुंगे याला ६४.४४ ग्रॅम वजनाच्या 'एमडी'सह (मेफेड्रोन) रंगेहाथ बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थासह २० हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या 'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना कचरा फॅक्टरी परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची पक्की खबर लागली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळधी बायपासवर दबा धरून आरोपी अजय गारुंगे (वय- रा. तांबापुरा कंजरवाडा, मेहरुण) याला घेरले. त्याची झडती घेतली असता तब्बल १ लाख ९३ हजार ३२० रुपये किमतीचे ६४.४४ ग्रॅम 'एमडी' ड्रग्स मिळून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. क्र. २९५/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तस्कराच्या नावावर गुन्ह्यांचे अर्धशतक भरण्याची वेळ!

अटक करण्यात आलेला आरोपी अजय गारुंगे हा कायद्याच्या चिंधड्या उडवणारा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी एमडी विक्री, गांजा तस्करी आणि घरफोडीसारखे तब्बल ३५ गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. एवढ्या मोठ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीनंतरही तो बिनदिक्कतपणे नशा विक्रीचे जाळे पसरवत होता. आता या गुन्ह्यात त्याच्या संपर्कातील आणखी दोन संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, उपनिरीक्षक सोपान गोरे, विजय देवराम पाटील, अतुल वंजारी, अकरम शेख, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, रवींद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे व तांत्रिक शाखेचे मिलिंद जाधव, गौरव पाटील यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT