सातपूर : श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका तरुणाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे. एन घटस्थापनेच्या दिवशी सर्वीकडे उत्साहाचे वातावरण असताना सदर कोयता गँगने दहशत पसरवून नागरिकांना भयभीत करून सातपूर पोलिसांना आव्हान दिले आहे. सदर थरारक घटना सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.
गुरुवारी (दि. ३) सांयकाळी सहाच्या सुमारास राधाकृष्णनगरातील धात्रक चौकामध्ये एक्टिवा वरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांचा पाठलाग करत येणाऱ्या रिक्षामधील आठ जणांच्या गँगने हल्ला केला. एक्टिवावरील दोन जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. परंतु अतुल खरे रा. हिंदी शाळा, श्रमिकनगर या तरुणास आठजणांनी सिनेस्टाईल मध्ये हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याने डोके, पाठ व पायावर जबरी वार केले. वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत दाखविली नाही. सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खासगी दवाखान्यात नेले. परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.