Arrested Khair wood smuggler
खैर लाकडाची तस्करी करणाऱ्या 'पुष्पा'ला नाशिकमधून अटक FiIle Photo
नाशिक

Nashik Crime | खैर तस्कर 'पुष्पा'ला नाशिकमधून अटक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : खैर लाकडाची राताेरात तस्करी करणाऱ्या पुष्पा उर्फ नवसुभाई हरिभाई लोहार याला वन विभागाच्या पथकाने शहरातील पेठ नाका परिसरातून सिनेस्टाईल अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाला चकवा देण्यात तो यशस्वी ठरला होता. मात्र पथकाने रचलेल्या सापळ्यात तो अडकला आणि तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

  • पुष्पा उर्फ नवसुभाई याने महाराष्ट्र गुजरात सीमेवर खैर तस्करी सुरू केली होती. 

  • गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन त्याचा शोध घेत होते.

  • वनविभागाच्या पथकाने नाशिकमधून त्याला अटक केली आहे

वनविभागाने असा रचला सापळा

गतवर्षी चंदन तस्करी विषयावर अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला पुष्पा हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटातील हिरोप्रमाणे गैरवर्तन करत स्वत:ला पुष्पा म्हणवून घेणाऱ्या नवसुभाई हरिभाई लोहार (वय ४०, रा. गुजरात) याने महाराष्ट्र गुजरात सीमेवर खैर तस्करी सुरू केली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्याविरोधात तीन वनगुन्हे दाखल झाले आहेत. वनविभागाकडून त्याचा शोध घेतला जात होता. परंतु, वन कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात तो यशस्वी ठरत होता.

दरम्यान, ताे नाशिक किंवा पेठ भागात येणार असल्याची गाेपनीय माहिती वनधिकाऱ्यांना मिळाली. त्याआधारे तीन पथक गठीत करण्यात येऊन नाशिक व पेठ भागात सापळा रचण्यात आला. अखेर लाेहार पेठनाका या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आला असता वनपथक त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले. याची कल्पना होताच त्याने धूम ठाेकत पळून जाण्याचा प्रयत्न केला. वनपथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करत लाेहारला अटक केली.

कारागृहात रवानगी

वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिकचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी, प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, अभिषेक अजेश्र, बापू शेवाळे, राहुल वाघ आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने रविवारी (दि.२३) लाेहारला न्यायालयीन काेठडी सुनावल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात वनसंरक्षणाची कामे केली जातात. मात्र, तस्करांकडून या भागातील वनसंपदेला लक्ष केले जाते. त्यामुळे गस्तीसह तस्कारांच्या माेरक्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पाच वनगुन्ह्यात फरार असलेल्या नवसुभाई लोहार याला शिताफीने अटक केली आहे. त्यामुळे खैरतस्कारांवर वचक निर्माण हाेईल.
रमेश बलैया, वनपरिक्षेत्र अधिकारी वनविकास महामंडळ ( फिरते पथक पेठ)
SCROLL FOR NEXT