नाशिक : रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाच्या बॅगेतून परस्पर दागिन्यांचे पाकीट लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
मंगला नीलकंठ बडगुजर (६५, रा. राजरत्ननगर, सिडको) या २ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ च्या सुमारास मुलगा विनय, सून सपना आणि दोन नातू यांच्यासह सिडको येथून रिक्षाने महामार्ग बसस्थानकाकडे निघाल्या होत्या. सकाळी ७.३० च्या सुमारास त्या बसस्थानकात पोहोचल्या. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने, त्यांनी बीपीची गोळी घेण्यासाठी बॅग उघडली. मात्र, त्यांना बॅगेत ठेवलेले पाकीट आढळून आले नाही. अज्ञात चोरट्याने हे पाकीट लंपास केले होते. या पाकिटात सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम होती. त्यानंतर शनिवारी (दि.२१) मुंबई नाका येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार मयूर पवार, सचिन करंजे यांना बातमीदारामार्फत चोरटा सिडकोतील मोरवाडी गाव येथे चोरलेले दागिने विक्रीस येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, पोलिस हवालदार सोमनाथ गुंड, मयूर पवार, सचिन करंजे, अनिल गाढवे, तुषार मते यांनी सापळा रचत सुनील जगन्नाथ कुमावत (४७, रा. कुमावतनगर, मखमलाबाद रोड) यास बेड्या ठोकल्या. त्याने चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे, तीन ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.