आंतरराष्ट्रीय गांजाची शहरात विक्री ; दोघे विक्रेते गजाआड  file photo
नाशिक

Nashik Crime | आंतरराष्ट्रीय गांजाची शहरात विक्री ; दोघे विक्रेते गजाआड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरात एमडीचे गुदाम आढळल्यानंतर आता थायलंड देशातून आणलेला गांजा विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करीत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून ६८६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. शहरातील काही व्यावसायिक या गांजाचा नशा करीत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

विशाल वसंत बावा गोसावी (२५, रा. शिवशक्ती चौक) व लविन महेश चावला (२६, रा. इंदिरानगर) अशी पकडलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा नोंद आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला. सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, बळवंत कोल्हे, चंद्रकांत बागडे, अर्चना भड, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, भारत डंबाळे यांनी त्रिमूर्ती चौक, शिवशक्तीनगर परिसरात संशयितांचा माग काढला. दोन्ही संशयितांना ताब्यात घेत झडती घेतल्यावर गांजा मिळाला. गोसावी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. परदेशातील गांजा नाशिकमध्ये विक्री होत असल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी सुरु केली आहे. गांजाची वाहतूक व पुरवठा कोणामार्फत होत होता याची चौकशी पोलिस करीत आहेत.

थायलंडच्या गांजाचा साठा

पोलिसांच्या माहितीनुसार, थायलंडमध्ये गांजाची सर्रास विक्री होते. त्यामुळे तेथून गांजाचा साठा नाशिकला आणण्यात आला. संशयितांनी नाशिकच्या काही व्यावसायिकांना या गांजाची विक्री केली. या व्यावसायिकांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी मौज म्हणून गांजा घेतल्याची कबुली दिल्याची सुत्रांनी सांगितले. तसेच नाशिकमध्ये मिळणारा गांजा अंदाजे २० रुपये प्रतिग्रॅम दराने मिळतो. तर थायलंडमधील गांजाची किंमती प्रतिग्रॅम ३२६ रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT