नाशिक : कारमध्ये गावठी कट्टा, कोयते, चॉपर घेऊन फिरणाऱ्या संशयितास गुंडा विरोधी पथकाने वडाळानाका परिसरात पकडले. पोलिसांनी संशयिताकडून कारसह हत्यारे असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिलिंद उर्फ दुल्ली मनोहर भालेराव (३७, रा. नागसेन नगर, वडाळानाका) असे या संशयिताचे नाव आहे.
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी 'स्टॉप अॅण्ड सर्च' मोहीम राबवली जात आहे. त्याचप्रमाणे गुन्हे शाखेकडून गुन्हेगारांची शोधमोहिम सुरू असते. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार विजय सुर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित भालेराव हा शस्त्रांसह फिरत असल्याचे समजले. पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप सगळे, अंमलदार सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, प्रविण चव्हाण व सुनिता कवडे यांच्या पथकाने वडाळा नाका परिसरात सापळा रचला. एमएच ०४ डीआर ००६५ क्रमांकाची कार दिसताच पोलिसांनी घेराव केला. संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी त्यास पकडले. कारची झडती घेतली असता चॉपर व कोयता आढळला. तसेच संशयिताने स्वत:जवळ पिस्तुल ठेवली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यास पकडून त्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.