नाशिक : शहरातील एका सदनिकेत भांगेच्या गोळ्या तयार केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अमली पदार्थ विरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. पथकाने सोमवारी (दि. २४) कारवाई करीत दोघांना पकडले. या दोघांकडून पथकाने सहा लाख ७२ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांचा वापर, विक्री व साठा रोखण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाची बैठक घेत संशयितांची धरपकड करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने तपास करीत भांगेच्या गोळ्या बनवणाऱ्यांची माहिती संकलित केली. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सोमवारी पहाटे ५ वाजता उपनगर येथील आंबेडकरवाडी परिसरातील गायत्रीनगरच्या कलावैभव अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. १३ मध्ये कारवाई केली. पथकाने दीपक किसन वाघ (४२, रा. पेठ रोड) व सागर मधुकर गरड (३२, रा. आंबेडकरवाडी) या दोघांना पकडले.
सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे, देवकिसन गायकर, अंमलदार बाळासाहेब नांद्रे, अनिरुद्ध येवले, महिला अंमलदार अर्चना भड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. त्यावेळी संशयित हे गिरणीसह इतर वस्तूंमार्फत भांगेसह गोळ्या बनवित असताना पथकाला मिळून आले. संशयितांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयितांकडून २८० किलो ३९६ ग्रॅम भांग जप्त केली आहे. या भांगेची किंमत दोन लाख ८० हजार ३९६ रुपये इतकी आहे. तसेच दोन गिरण्या, गॅस शेगड्या, पातेले जप्त केले आहे. भांगेच्या गोळ्या, पॅकिंग केलेल्या बाटल्या, पुड्या, ग्राइंडर जप्त केले. गोळ्यांना 'श्री केडीएम' मेवावटी हे नाव दिले आहे.