नाशिक : प्रेयसीला नायब तहसीलदार असल्याची बतावणी करीत, बढतीने बदली करण्याच्या बहाण्याने प्रेयसीकडून तब्बल सात लाख रुपये उकळणाऱ्या प्रियकरावर आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून, त्याने बदलीच्या नावे प्रेयसीकडून पैसे घेतले. पैसे परत न करता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने प्रेयसीने पोलिसांत धाव घेतली.
निनाद प्रवीण कापुरे ऊर्फ निनाद विनय कापुरे (रा. साठेनगर, धारणगाव, जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. प्रेयसीच्या फिर्यादीनुसार, संशयिताने त्यांना स्वत: नायब तहसीलदार असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने प्रेयसीला पुणे येथे बढतीने बदली होणार असल्याचे सांगत त्यासाठी त्याने तिच्याकडे सात लाखांची मागणी केली. ही रक्कम चार-पाच दिवसांत परत देतो, असा शब्द दिला. प्रारंभी प्रेयसीने पैसे देण्यास नकार दिला. विश्वास संपादन करीत त्याने सतत पैशांची मागणी केली. त्यामुळे प्रेयसीने त्यास 'आरटीजीएस'ने ३ डिसेंबर २०२४ रोजी ५० हजार, ४ डिसेंबर २०२४ रोजी तीन लाख व अडीच लाख, तसेच, फोन पे ने २ डिसेंबर रोजी ५० हजार, ३ डिसेंबरला ५० हजार असे एकूण सात लाख रुपये संशयिताला दिले. हे सात रुपये तीन-चार दिवसांत देणार असल्याचे कबूल केले हाेते. परंतु, त्याने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे प्रेयसीने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला असता, संशयिताने तुझे पैसे देणार असून, व्याजासकट देईल. अडचणीत आहे समजून घे, असे म्हणत विश्वास संपादन केला.
संशयित कापुरे पुण्यात नसून त्याच्या आसपासच्या अहिराणी भाषेतील आवाजावरून प्रेयसीने तो खोटे बोलत असल्याचे ओळखले. तसेच, तो नायब तहसीलदारही नसल्याचे त्यांना समजले. त्यातून पोलिसांत तक्रार करणार असल्याचे समजताच त्याने दोन लाख रुपये त्यांना पाठविले. परंतु, उर्वरित रक्कम वेळेत दिली नाही. या प्रकरणाचा आडगाव पोलिस तपास करत आहेत.