नवरात्रोत्सवाचे नियोजन करताना वाद झाल्याने हवेत गोळीबार  File Photo
नाशिक

Nashik Crime | नवरात्रोत्सवाचे नियोजन करताना वाद झाल्याने हवेत गोळीबार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नवरात्रोत्सवाचे नियोजन करताना सार्वजनिक मंडळातील सदस्यांमध्ये वाद झाल्यामुळे एकाने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची घटना जेल रोड येथील मॉडेल कॉलनीत शिवशक्ती जलकुंभ गार्डनजवळ घडली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चौघांपैकी एकाला पकडले आहे.

नितीन राजेंद्र बर्वे, संतोष पिल्ले, संतोषचा मित्र भागवतसह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी संशयित नितीन बर्वे याला पकडले आहे. सुयोग खंडेराव गुंजाळ (३२, रा. मॉडेल कॉलनी, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते व संशयित हे मित्र असून, परिसरातील वसंतविहार मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी त्यांची निवड झाली आहे. रविवारी (दि. २२) रात्री 10 वाजता गुंजाळ हे माॅडेल काॅलनीतील गार्डनजवळ बसलेले असताना, त्यांना नितीन बर्वे याचा फोन आला होता. तेव्हा गुंजाळ यांनी नवरात्राेत्सवाची तयारी करत असताना माझ्यावरच सगळी जबाबदारी असून, कुणीच धावपळ करत नाही आणि तुम्ही इकडे तिकडे फिरत आहे असे म्हटले. त्यावेळी बर्वे याने आम्ही वर्गणी घेण्यासाठी संताेष पिल्ले यांच्याकडे आलाे आहे. ते यंदा चांगली वर्गणी देणार आहे, असे सांगितले. मात्र, गुंजाळने तुम्ही मग फिरत बसा, संताेष पिल्ले गेला उडत मला नाही करायची नवरात्र, अध्यक्षपदही नकाे असे म्हटले. यावरून वाद झाल्यानंतर रात्री 11 वाजता संशयित कारमधून आले व त्यांनी गुंजाळला कारमध्ये बसण्यास सांगितले. गुंजाळने नकार देत घर गाठले. त्यानंतर संशयित गार्डनजवळ आले व त्यांनी हवेत गाेळीबार केला. याबाबतची फिर्याद गुंजाळ यांनी दाखल केली असून नाशिक राेड पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, गोळीबार एअरगनमधून केल्याचा दावा संशयिताने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT