देवळा ; देवळा पोलिसांनी अवैद्य गुटखा विक्री विरोधात कारवाईचा बडगा उगारला असून या कारवाईत ६.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन तालुक्यातील एका गुटखा विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली . या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ( दि ०४) रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत अवैध सुगंधित तंबाखू, जर्दा व पानमसाला गुटखा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक/साठवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध देवळा पोलिसांनी कारवाई केली.
सदर कारवाईदरम्यान साहिल जब्बार तांबोळी( २३) रा. पिंपळगाव (वा.), ता. देवळा याच्या शेतातील घरामधून महाराष्ट्र राज्यात उत्पादन, वितरण व साठ्यास प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू (जर्दा), पानमसाला व गुटखा असा एकूण ₹१,८७,५६०/- किमतीचा मुद्देमाल तसेच सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरलेले अशोक लेलँड कंपनीचे पॅक बॉडी वाहन क्र. MA-12/QW-3100, किंमत अंदाजे ₹४,५०,०००/- असा एकूण ₹६,३७,५६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह पथकातील पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार, शरीफ शेख ,दिलीप सोनवणे यांनी छापा टाकून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.