नाशिक : मॅफेड्रॉन आणि गांजा विक्री प्रकरणात अटकेत असलेल्या वडाळा येथील छोटी भाभीला पाठबळ देणाऱ्या इरफान ऊर्फ चिपड्या शेख व त्याचा जोडीदार करण सोनटक्के यांना न्यायालयाने सोमवार (दि. ७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. करण हा गांजाच्या व्यवहारात सक्रिय होता, त्याने दिलेल्या माहितीनुसार इरफानची माहिती समोर आली. तसेच इरफान हा अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या छोटी भाभीच्या सतत संपर्कात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
वडाळा गावात नसरिन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख हिच्या ताब्यातून पोलिसांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये एमडीचा साठा पकडला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करीत त्यावेळी छोटी भाभीसह सहा जणांची धरपकड केली. त्यात इम्तियाज शेख, सलमान फलके, शब्बीर अब्दुल मेमन, सद्दाम सारंग यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी वर्षभरानंतर छोटी भाभीसह इतर संशयितांचे कॉल डिटेल्स तपासले असता, इरफान याने त्यांना शेकडो कॉल केल्याचे उघड झाले. तसेच करण हा वर्षभरापासून फरार होता. त्यामुळे पोलिसांनी तपास करून करणला अटक केली. त्याच्या चौकशीतही इरफानचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्यास पकडले. इरफान हा भाजप लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इरफान राजकीय संबंधांचा वापर करून छोटी भाभीसह इतरांना अवैध धंद्यात पाठबळ देण्यासोबतच संरक्षण देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान हा वडाळ्यासह शहरातील काही भागांतून 'वसुली' करायचा. त्यामुळे ही वसुली कोणाच्या सांगण्यावरून व कोणासाठी केली जात होती, तसेच त्याला राजकीय पाठबळ कोणाकडून होते का याचाही तपास पोलिसांनी सुरू केल्याचे समजते.
पोलिसांनी सुरुवातीलाच छोटी भाभी व वसिम यांचे आठ मोबाइल जप्त केले होते. त्याच्या तांत्रिक विश्लेषणानुसार दोघे सातत्याने इरफानच्या संपर्कात असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी पाळत ठेवत इरफानला ताब्यात घेतले. इरफानच्या सोशल मीडियावरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेतचे फोटो आहेत. या गुन्ह्यातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्यास आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.