सिडको : अंबड पोलिस ठाणे येथे जप्त केलेले सोन्याचे दागिने व अटक केलेले आरोपी समवेत पोलिस अधिकारी 
नाशिक

Nashik Crime : भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटणाऱ्या 'बंटी-बबली' दाम्पत्याला अटक, अंबड पोलिसांची मोठी कारवाई

१६ तोळे सोने, चांदीचे दागिने, ८ मोबाईल, लॅपटॉपसह २४.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्यभरात अनेक गुन्हे उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

सिडको : भाड्याने राहण्यासाठी घर घेऊन प्रथम घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच त्यांच्याच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, असा अनोखा गुन्हेगारी फंडा अवलंबणाऱ्या 'बंटी-बबली' दाम्पत्याला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयित पती-पत्नीविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब वाकचौरे (रा. विजयनगर, नाशिक) यांच्या घरातून २३ जून रोजी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता, एका संशयित महिलेची संशयास्पद हालचाल आढळून आली.

त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधित महिलेची ओळख पटवली. ओळखपत्राच्या तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचे मोबाईल क्रमांक मिळवण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बोईसर (जि. पालघर) येथून नवनीत मधुकर नाईक (वय ५६, रा. भांडुप, मुंबई) व त्याची पत्नी स्मिता नवनीत नाईक (वय ४२) यांना ताब्यात घेतले.

पोलीस कोठडीत असताना झालेल्या चौकशीत संशयितांकडून १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि चोरीतील सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा जुना माल (ज्याची सध्याची बाजारभावानुसार किंमत २१ लाख ११ हजार रुपये आहे) जप्त करण्यात आला. याशिवाय ८ मोबाईल फोन, एक लॅपटॉप व इतर साहित्य असा एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

तपासात एक धक्कादायक बाब समोर आली असून, हे दोन्ही आरोपी वेगवेगळ्या शहरांमध्ये भाडेकरू म्हणून राहत होते. घर भाड्याने घेताना ते कोणताही अधिकृत भाडेकरार करत नसत; तसेच स्वतःचा कायमस्वरूपी पत्ता किंवा खरी ओळखही लपवून ठेवत असत. काही दिवस राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि योग्य संधी साधून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून पसार व्हायचे, अशी त्यांची मोडस ऑपेरांडी (गुन्ह्याची पद्धत) होती. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी नागरिकांना भाडेकरू ठेवताना आवश्यक कागदपत्रांची व पोलीस पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, संशयित पती-पत्नीविरोधात अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळूंज, भोर, बडनेरा, पोयनाड, कोपरगाव, वाशी (मुंबई), सदर बाजार, छावणी, मालेगाव तालुका आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी अनेक घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष ठुबे, समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, अनिल गाढवे, मयूर पवार, योगेश शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे भाडेकरूच्या आडून घरफोड्या करणाऱ्या या 'बंटी-बबली' दाम्पत्याचा पर्दाफाश झाला असून, त्यांच्या अटकेमुळे राज्यातील अनेक गुंतागुंतीच्या चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT