अवैध सावकार देवरेसह तिघांचे जामीन फेटाळले file
नाशिक

Nashik Crime | अवैध सावकार वैभव देवरेसह तिघांचे जामीन फेटाळले

सुनावणी जलद गतीने घेण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अवैध सावकारी करीत कर्जदारांकडून अवास्तव व्याजवसुली करण्यासाेबतच कर्जदारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव देवरेसह त्याची पत्नी सोनल व शालक निखील पवार यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच, संशयितांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, सुनावणी जलद गतीने घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गंगापूर रोडवरील धीरज पवार या चहा व्यावसायिकाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी नांदूर घाटात गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची पत्नी गीतांजली पवार यांच्या फिर्यादीनुसार, धीरज पवार यांनी संशयित वैभव देवरे याच्याकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याची परतफेड ही पवार यांनी केली असताना देवरे सातत्याने व्याजापोटी ३२ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी देवरे याच्यासह त्याची पत्नी व शालकानेही धीरज यांना त्रास दिला. या त्रासाला कंटाळून धीरजने आत्महत्या केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात अवैध सावकारी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तिघांना अटक झाली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी न्यायालयात २७६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

खटला जलदगतीने चालणार

संशयित देवरे याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर गुरुवारी (दि. ९) न्यायालयात सुनावणी झाली असता, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायधीश यु. जे. मोरे यांनी तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. संशयित देवरे याच्याविरोधात खंडणी, प्राणघातक हल्ला, दरोडा, फसवणूक, अवैध सावकारी, अपहरण, मनीलाँड्रिंग यासारखे गंभीर स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तपासामध्ये संशयित देवरे गुन्ह्यांसंदर्भातील व्हॉटसॲप चॅटिंगही न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे संशयित देवरे याच्यासह त्याची पत्नी व शालक हे जामिनावर सुटल्यास त्यांच्याकडून तक्रारदारांना त्रास देण्याची शक्यता अधिक आहे. या कारणाने न्यायालयाने संशयितांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. तसेच, खटला जलदगतीने चालविण्याचेही आदेश दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे अॅड. रवींद्र निकम यांनी युक्तिवाद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT