नाशिकरोड: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशन आयोजन २२ ते २४ जून या कालावधीत श्रीकृष्ण लॉन्स, बोधलेनगर येथे होत असून यात ४०० प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती सुभाष लांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनात देशभरातील नेते मार्गदर्शन करणार असून, राष्ट्रीय सचिव कॉ. अमरजीत कौर, कॉ. पाशा पद्मा, डॉ. भालचंद्र कांगो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २३ जून रोजी कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार डॉ. कांगो यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अधिवेशन स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. सहसचिव डॉ. राम बाहेती, कॉ. राजू देसले, प्रकाश रेड्डी, कॉ. श्याम काळे, नामदेव चव्हाण, सुकुमार दामले आदी उपस्थित होते. अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठीचा कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत राज्य सचिव सुभाष लांडे यांनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढत सरकार नागरिकांना फक्त आश्वासने देत आहे ते पूर्ण करत नाही, असा आरोप केला. याचे दाखले देत ते म्हणाले की, ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार त्या अजून पूर्ण झाल्या नाही, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही, हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवले जात आहे, जनसुरेक्षा विधेयक आणून आंदोलन करणाऱ्या व सरकारला जाब विचारणाऱ्यांचे तोंड बंद केले जात आहे. त्या विरोधात आम्ही येत्या ३० तारखेला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे.