नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी परिसरात पत्नीचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी मंगळवारी (दि. २७) हा निकाल दिला. या प्रकरणातील अन्य चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोरे मळा येथील कुसुमाग्रज उद्यान परिसरात ६ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. विजय त्र्यंबक सावंत यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यांची मुलगी दिव्या विजय सावंत ही माहेरी राहत असताना पती राजू पोपट मते (२४) आणि विशाल राजू माने (२३) यांनी संगनमताने तिला मोबाईल देण्याच्या बहाण्याने कुसुमाग्रज उद्यान येथे नेले.
तेथे दिव्याची मैत्रीण खुशबू यादव हिच्याशी बोलण्यात तिला गुंतवून ठेवून राजू मते याने हातातील शेव्हिंग ब्लेडने दिव्याच्या तळ्यावर वार करत तिच्या हत्येचा प्रयत्न केला. यावेळी अन्य आरोपी रेखा पोपट मते (४५), दिपाली शंकर हेगडे (२६) आणि पूजा प्रकाश रेळेकर (२८) यांनीही दिव्याचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास पंचवटी पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक पी. पी. मुंडे यांनी केला.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी साक्षीदारांचे पुरावे प्रभावीपणे मांडले. त्यानुसार न्यायालयाने राजू मते याला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
पीडितेला एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. रक्कम न दिल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अन्य चार आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. या खटल्यात पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पाठपुरावा केला.