नाशिक : एन. बी. टी. लॉ कॉलेज मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशिलेचे उद्घाटन करताना सरन्यायाधीश भूषण गवई, समवेत मुख्य न्या. श्री चंद्रशेखर, न्या. अश्विन भोबे, न्या. सारंग कोतवाल, न्या. मकरंद कर्णिक, डॉ. आर. पी. देशपांडे. डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. ए. ए. कादरी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Court News : वकिली व्यवसायाला संविधानिक मूल्य, प्रामाणिकपणाची जोड द्यावी

सरन्यायाधीश भूषण गवई : संविधान उद्दिशिका काेनशिलेचे उद्‍घाटन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वकिली व्यवसाय करताना संविधातील उद्देशिकेतील मूल्य, सामाजिक न्याय, आणि प्रॅक्टिसला प्रामाणिकपणाची जोड द्यावी, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने यंदा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केले जात आहे. यानिमित्ताने गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एन. बी. टी. विधी महाविद्यालयात संविधान उद्दिशिकेच्या काेनशिलेचेही उद्‍घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते शनिवार (दि.२७) झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्या. अश्विन भोबे, न्या. सारंग कोतवाल, न्या. मकरंद कर्णिक, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे, एनबीटी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. ए. ए. कादरी आदी उपस्थित होते.

संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा आत्मा आहे, असे नमूद करून सरन्यायाधीश गवई म्हणाले, उद्देशिका हा संविधानाचा भाग आहे की नाही, हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, उद्देशिका हा संविधानाचा महत्वाचा अविभाज्य आणि महत्वपूर्ण भाग आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, अमरावतीतील झोपडपट्टी भागात राहून मी शिक्षण पूर्ण केले. या विधी क्षेत्रात आल्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केलेली मूल्य, तत्व यांना न्यायदान प्रक्रियेत नेहमी शीर्षस्थ ठेवले. मूल्यांची जपवणूक केल्यानेच आज न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर येऊ शकलो, असेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. विद्यार्थ्यांनी न्यायदान प्रक्रियेत विधिज्ञ म्हणून काम करताना प्रारंभीचे दिवस अत्यंत संघर्ष, कष्टांचे असतील. मात्र, सदैव उच्च, उदात्त ध्येय ठेवा. स्वत:शी प्रामाणिक राहून मूल्यांची जपवणूक करत अवितर मेहनत करा. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शी स्पर्धा करुन सर्मपित भावनेतून प्रामाणिकपणे वकिली केल्यास यश दूर नाही,असा मंत्र देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी डॉ. दीप्ती देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्य एच. ए. कादरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मेधा सायकखेडकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शहरातील विविध विधी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार केला.

नाशिक : एन. बी. टी. लॉ कॉलेज मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशिलेचे उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई, व्यासपीठावर. प्राचार्य डॉ. ए. ए. कादरी, डॉ. दीप्ती देशपांडे, मुख्य न्या. श्री चंद्रशेखर, न्या. अश्विन भोबे, न्या. सारंग कोतवाल, न्या. मकरंद कर्णिक, डॉ. आर. पी. देशपांडे.

पीएचडी सेंटरचे उद्‌घाटन

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ए.बी.टी. विधी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच भारताचे सरन्यायाधीश यांनी भेट दिल्याने विद्यार्थ्यांसह अध्यापक वृंदामध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले. सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते महाविद्यालयातील विविध शिक्षणक्रम तसेच पीएच.डी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. विधीविषयक पुस्तकाचे प्रकाशनही त्यांनी केले. समन्वयक डॉ. बी. जी. कौरानी व डॉ. एस. के. मांडावकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT