नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या आवारात नवीन वाहनतळाची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात दिवसेंदिवस वाहनसंख्या वाढत असल्याने पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी, अनेक वाहने ही न्यायालयाबाहेर रस्त्यावरच पार्क होत असल्याने त्यातून वाहतूककोंडीची समस्या सतावत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी नवीन जिल्हा न्यायालयाच्या आवारात सहा मजली वाहनतळ उभारण्यास शासनाने मंजुरी दिल्याने, भविष्यात वाहतुककोंडीच्या त्रासातून वाहनधारकांची सुटका होणार आहे.
वाहतूक कोंडीतून जिल्हा न्यायालयाची सुटका व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नवीन जिल्हा न्यायालयाच्या आवारात वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून तळमजला व सहा मजले बांधण्यासाठी एकूण 44 कोटी 39 लाख अंदाजित खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.
जिल्हा न्यायालयाच्या शेजारी जिल्हाधिकारी कार्यालय, समोर शाळा, बसस्थानके असल्याने या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. संपूर्ण जिल्ह्यातून अभ्यागत याठिकाणी येत असतात. आरोपींना न्यायालयात सादर करण्यासाठी पोलिसांची अनेक वाहने या भागात पार्क करण्यात येतात. त्यामुळे अनेकवेळा वाहने पार्क करण्यासाठी न्यायालय परिसरात जागाच शिल्लक राहत नाही. तेव्हा अनेक वाहनधारक मुख्य रस्त्यालगत वाहने पार्क करतात. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. मात्र आता वाहनतळाचा प्रश्न मिटणार आहे.
तळमजल्यावर 365 दुचाकी पार्क होऊ शकतील, तर पहिल्या मजल्यावर 24 चारचाकी व 240 दुचाकी, दुसऱ्या ते सहाव्या मजल्यावर प्रत्येकी 76 चारचाकी वाहनांना उभे करता येईल.