धनराज माळी
नाशिक : सामान्य नागरिकांच्या जिल्हास्तरावर न सुटणाऱ्या तक्रारी थेट मंत्रालयात दाद मागता यावे म्हणून आता मुंबईत मंत्रालयात जाण्याची गरज नाही, तर शासनाने जिल्हास्तरावरच त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन वर्षांत एक हजार २४२ तक्रारी निकाली काढून तक्रारदारांना न्याय मिळाला आहे.
विविध विभागांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जावे लागू नये म्हणून शासनाने दि. १९ डिसेंबर २०२२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू केले आहे. गेल्या तीन वर्षांत या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे १ हजार २८५ विविध विभागांच्या समस्या व तक्रारींचे अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी १ हजार २४२ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. केवळ ४३ तक्रारी अर्ज प्रलंबित आहेत. यात सन २०२४ चे २४ तक्रारींचा समावेश आहे तसेच २०२५ मधील १९ तक्रार अर्ज आहेत. तर सन २०२३ चे ६३० पैकी ६३० तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
एकूण तक्रारी अर्ज निकालाची टक्केवारी ९६.६५ टक्के एवढी आहे. ४३ तक्रारींचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यात जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक या विभागांच्या तक्रारींचे अर्ज शिल्लक आहेत. ते लवकरच मार्गी लागतील, असे या कक्षातर्फे सांगण्यात आले.