जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनाच ऑनलाइन फसवण्याचा प्रयत्न झाला.  File
नाशिक

Nashik Fraud Crime | जिल्हाधिकाऱ्यांनाच ऑनलाइन फसवण्याचा डाव, अपघात झाल्याचा मेसेज; संशयिताला अटक

आर्थिक फसवणुकीचा प्रकार ; पालघरमधून संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्हाधिकारी साहेब, सहलीसाठी निघालेल्या मुंबई, घाटकोपर येथील विद्यालयाच्या बसला अपघात झाला असून, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, आपण ती त्यांना तत्काळ करावी, असा मेसेज मंगळवारी (दि. २५) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला. मात्र, चौकशीत हा मेसेज फसवणुकीसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने तपास करून रविकांत मधुकर फसाळे या संशयिताला पालघरमधून ४८ तासांत अटक केली.

सध्या ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. या प्रकारांना अशिक्षित, वयोवृद्धच नव्हे, तर माहिती तंत्रज्ञानाशी परिचित असलेले नागरिकही बळी पडल्याचे रोजच कुठे ना कुठे तरी ऐकायला मिळते. ठगांनी असेच एक जाळे थेट जिल्हाधिकाऱ्यांवर फेकले. मात्र, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या सजगतेमुळे भामट्यांचा डाव अयशस्वी ठरला.

याबाबत घटनाक्रम असा, नाशिक - मंगळवारी (दि. 25) दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी शर्मा यांच्या भ्रमणध्वनीवर शालेय विद्यार्थ्यांच्या बस अपघाताचा संदेश आला. संदेशात नमूद क्रमांकावर (9597356640, पाटील) संपर्क साधला असता, घाटकोपर येथील विद्यार्थ्यांची बस मुंबई नाका येथे अपघातग्रस्त झाल्याची आणि त्यात चौघांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच परतीच्या प्रवासासाठी मदतीची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले. तत्काळ कृती करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांनी नायब तहसीलदारांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. आपत्ती व्यवस्थापन शाखेने शहर पोलिस नियंत्रण कक्ष आणि पोलिस निरीक्षक, मुंबई नाका यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. मात्र, नाशिक परिघात सकाळी 8 ते रात्री 12 या कालावधीत असा कोणताही अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.

..अन‌् आवळल्या संशयिताच्या मुसक्या

.अधिकाऱ्यांनी खात्री करण्यासाठी पुन्हा त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, संबंधित व्यक्तीने, 'आम्ही एसएमबीटी मेडिकल कॉलेज येथे आहोत, हे ठिकाण घोटीजवळ आहे,' असे सांगितले. त्यानुसार, इगतपुरी तहसीलदारांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाने अशा प्रकारची कोणतीही नोंद नसल्याचे कळवले. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मोबाइल लोकेशन ट्रेस करून पालघरच्या मोखाडा तालुक्यातून रविकांत मधुकर फसाळे या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात इगतपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT