नाशिक : गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून, तापमान 12. 5 अंशांच्या खाली आले आहे. तर निफाडमध्ये 10 अंशांच्या खाली पारा गेल्याने जिल्हावासीयांना हुडहुडी भरली आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
दिवसभर थंडीचा गारठा जाणवत नसला तरी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 7 ते रात्री अकरापर्यंत थंडीचा अनुभव जिल्हावासीयांना येत आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे. उत्तरेकडून येणारे वारे आणि कमी झालेली आर्द्रता यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. शहराचा पारा 12 डिग्रीच्या खाली घसरल्याने शहर जिल्ह्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. हा हंगाम रब्बी पिकांच्या लागवडीसाठी उत्तम समजला जातो. थंडी वाढल्यामुळे शेतकरी पिकांची लागवड करण्यात गुंतलेला दिसून येत आहे.