Nashik Cold News | गेल्या आठवडाभरापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतली असून, दिवसभर गारवा जाणवत असल्याने, नाशिककरांना उबदार कपड्यांमध्ये वावरावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे तापमान सातत्याने घसरत आहे. शुक्रवारी (दि. ३) शहरात किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले, तर निफाडचे तापमान कमालीचे घसरत आहे.
मध्य भारतातील मैदानी भागातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान १२ ते १३ अंशांवर स्थिरावले होते. मात्र, वाऱ्याचा झोत वाढल्याने, तापमान सातत्याने घसरत आहे. दिवसभर थंडी जाणवत असून, पहाटेच्या सुमारास थंडी अन् धुक्याचा मिलाफ अनुभवयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकचे तापमान सहा अंशांवर आल्याने, थंडी वाढली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे थंडी गायब झाली होती. आता पुन्हा एकदा थंडी परतल्याने, नाशिककरांना दिवसभर उबदार कपडे परिधान करून वावरावे लागत आहे. पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.